27 निवडणुका हरलेल्या राहुल गांधींची गिनीज बुकमध्ये नोंद करण्याची मागणी

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये सपाटून मार खालेल्या काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. राहुल गांधींना सलग 27 वेळा पराभवाचा सामना करावा लागला असून हा एक रेकॉर्ड असल्याचा दावा करत एका विद्यार्थ्याने ही मागणी केली आहे. विशाल दिवान असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. विशाल दिवान मध्य प्रदेशातील होशांगबाद येथील रहिवाली असून इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे.
निवडणुकांमध्ये होणा-या पराभवांमुळे आपल्या राजकीय कारकिर्दीत अगोदरच धक्के खात असलेले राहुल गांधी पुन्हा एकदा हेडलाईन्समध्ये आले आहेत. मात्र यावेळी ते चर्चेत येण्यामागचं कारण वेगळंच आहे. विशाल दिवान या विद्यार्थ्यांने राहुल गांधींच्या या अपयशी कारकिर्दीची दखल घेत त्यांचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याची मागणी केली आहे.
राहुल गांधींनी सक्रीय राजकरणात आणि निवडणूक प्रचारात सहभाग घेतल्यापासून काँग्रेस पक्षाचा पराभव होत असल्याचं विशाल दिवान याचं म्हणणं आहे. इतक्या वेळा तोही सलग पराभव होत असल्याने राहुल गांधी पुस्तकात नोंद होण्यासाठी पात्र असल्याचंही तो सांगतो. आपली ही इच्छा पुर्ण करण्यासाठी त्याने गिनीज बुकच्या अधिका-यांना पत्रही लिहिलं आहे. इतकंच नाही तर त्यासाठी नोंदणी शुल्कही भरला आहे. त्याचा अर्ज स्विकारण्यात आल्याचंही कळवण्यात आलं आहे. मात्र ही विनंती स्विकारण्यात आलेली आहे किंवा नाही हे मात्र गिनीज बुकने कळवलेलं नाही.
राहुल गांधींची सोशल मीडियावर अनेकदा खिल्ली उडवण्यात आली आहे. त्यांचं भाषण, राजकीय ज्ञान यावरुन त्यांची अनेकदा थट्टामस्करी करण्यात आली आहे. काही दिवसांपुर्वी अखिलेश यादव यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत किती जागा आहेत हे विसरल्यावर राहुल गांधीवर सोशल मीडिया तुटून पडली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये पाचपैकी चार ठिकाणी काँग्रेस विरोधी बाकावर बसला आहे. विशेष म्हणजे गोवा आणि मणिपूरमध्ये काँग्रेसकडे बहुमत असतानाही ते सत्ता स्थापन नाही करु शकले.
अमेठी आणि रायबरेली जो राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा मतदारसंघ आहे तिथेही काँग्रेस जिंकू शकलं नाही, आणि भाजपा उमेदवाराचा विजय झाला. फक्त पंजाबमध्ये काँग्रेस आपली सत्ता स्थापन करु शकलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *