गडचिरोलीत विषारी दारूमुळे पोलिस शिपायासह तिघांचा मृत्यू

संपूर्ण दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ात मालेवाडा पोलिस मदत केंद्रांतर्गत सायगाव येथे शनिवारी विषारी दारू प्यायल्याने एका पोलिस शिपायासह तिघांचा मृत्यू झाला. उमेश बुधू मडकाम (३५) व जितेंद्र ऋृषी दुगा (२०) व पोलिस शिपाई तुळशीराम करंगामी, अशी मृतांची नावे आहेत. तुळशीराम करंगामी गडचिरोली पोलिस मुख्यालयात श्वानपथकात होता. नामकरण विधीच्या कार्यक्रमानंतर हा प्रकार घडला आहे.

सायगाव येथे शनिवारी प्रभाकर सुंदरशहा मडकाम यांच्या मुलाच्या नामकरणविधी होता. यानंतर काही जण गावात दारू पीत बसले होते. काही क्षणातच तिघांची प्रकृती बिघडली. त्यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात आणल्यावर उमेश मडकाव व जितेंद्र दुगा यांना मृत घोषित करण्यात आले. तुळशीराम करंगामीची प्रकृती गंभीर असल्याने त्याल गडचिरोलीच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. मात्र रविवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला. तुळशीराम करंगामी धानोरा तालुक्यातील पुडियाल येथील राहणारा होता. जितेंद्र दुगा घर बांधकामासाठी काही दिवसांपूर्वी सायगावला आला होता. रविवारी त्याच्या घरी पुजा असल्याने चिचेवाडय़ाला जाणार होता. दारू विषारी होती का, याची शहानिशा तपासाअंतीच होणार आहे. मात्र, औषधाची बाटली अर्धवट स्वच्छ करून त्यात दारू आणलेली होती, अशी गावात चर्चा आहे.

 विशेष म्हणजे, सायगावजवळ सुरसुंडी येथे २ एप्रिल रोजी व्यसनमुक्तीसाठी शेषराव महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व व्यसनमुक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून ज्येठ समाजसेवक डॉ. अभय बंग उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वीच विषारी दारूने तिघांचा बळी घेतला आहे. संपूर्ण बंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्य़ात सर्रास दारूविक्री सुरू आहे. जिल्हा पोलिस दलाने त्यासाठी अभियान तीव्र केले असले तरी नागपूरसह छत्तीसगड, तेलंगणा व मध्यप्रदेशातून येथे दारूचा ओघ सुरू आहे. गडचिरोली पोलिस अधिक तपासणी करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *