पाचशेच्या एकाच नोटेवर वेगवेगळे क्रमांक

हिंगोलीतील सिंडीकेट बँकेतील प्रकार

आता रंग लागलेल्या नोटा बँक स्वीकारणार नसल्याचे बँक अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत असतानाच येथील सिंडीकेट बँकेच्या एका शाखेत ५०० रुपयाच्या एकाच नोटेवर दोन वेगवेगळे क्रमांक, नंबर असल्याचे आढळून आल्याने ५० हजार रुपये बँकेतून उचलणाऱ्या  ग्राहकाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली असून या नोटा बनावट तर नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

पूर्वी नोटांना रंग लागले अथवा कोणी नाव लिहिले तरी त्या नोटा बँकेकडून चलनात चालत होत्या. परंतु नोटबंदीच्या निर्णयानंतर बाजारात आलेल्या पाचशे व दोन हजाराच्या नोटांना आता होळीनिमित्त रंग लागला अथवा नोटेवर काही मजकूर, नाव लिहिल्यास नोटा बँकेत स्वीकारण्यात येणार नाहीत, अशा प्रकारच्या सूचना बँक अधिकाऱ्यांमार्फत दिल्या जात आहेत.

हिंगोलीतील मतीन खान महेबुब खान या व्यावसायिकाने सिंडिकेट बँकेच्या शाखेतून आपल्या खात्यावरून ५० हजार रुपये काढले.

रोखपालाने त्याला पाचशे रुपयांच्या १०० नोटांचे एक बंडल दिले होते. या बंडलमधील प्रत्येक नोटेवर दोन वेगवेगळे नंबर असल्याचे त्या ग्राहकास आढळून आल्याने त्याची तारांबळ उडाली.

विशेष म्हणजे एकाच नोटेवर वरच्या बाजूला एक क्रमांक, तर खालच्या बाजूला दुसरा क्रमांकच्या नोटा आहेत. या नोटांवर १० अंकाचा फरक दिसून येतो, तर वरच्या नोटेवर ३एमए ५९४३९४ तर खालच्या नोटावर ३एमएम ५९४४०४ असा क्रमांक असल्याचे दिसून येते. १० अंकाचा फरक सर्वच त्या १०० नोटांमध्ये आहे. नोटांच्या क्रमांकातील या फरकामुळे पाचशे रुपयांच्या नोटा बनावट तर नाहीत ना, असा संशय निर्माण झाला आहे. क्रमांक बदललेल्या पाच लाख रुपयांच्या नोटा वितरित झाल्याचे बँक अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. परंतु याबाबत बँक प्रशासनाकडून तूर्त काहीही माहिती देण्यात आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *