मैत्रीस नकार दिल्यानं तरुणीच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार

जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत एका मुलीच्या जीवाशी खेळ झाल्याचं समोर आलं आहे.

मैत्री करण्यास मुलीनं नकार दिल्याने एका तरुणानं तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी, पोलिसांनी शंकर भारद्वाज या नराधमाला गजाआड केलंय.

गेल्या वर्षापासून शंकर हा बबिता या मुलीच्या मागे लागला होता. मैत्री करण्यासाठी तो नेहमीच तिचा पाठलाग करायचा. सतत तिच्यावर लक्ष ठेवायचा… तिला मानसिक त्रास द्यायचा… या प्रकाराला कंटाळून बबिताने त्याला दम देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, याचा राग मनात धरुन या आरोपीने तिला शिविगाळ केली आणि तिच्या चेहऱ्यावर ब्लेडने वार केले.

या घटनेनं हादरलेल्या बबिताच्या कुटुंबियांनी बांगुर नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत शंकर भारद्वाजला अटक केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *