उत्तरप्रदेशमधील सहाव्या टप्प्यातील मतदानाला शनिवारी सकाळी कडेकोट बंदोबस्तात सुरुवात झाली. सहाव्या टप्प्यात उत्तरप्रदेशमधील ४९ जागांसाठी मतदान होणार आहे. समाजवादी पक्षाचे मुख्तार अन्सारी, त्यांचा मुलगा अब्बास, दुर्गा प्रसाद यादव आणि राम गोविंद चौधरी अशा दिग्गज नेत्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
उत्तरप्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून शनिवारी सहाव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली. उत्तरप्रदेशमधील ४०३ जागांपैकी ४९ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. ४९ विधानसभा मतदारसंघांमध्ये १७, ९२६ मतदान केंद्र असून १ कोटी ७२ लाख मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये ९४ लाख ६० हजार पुरुष आणि ७७ लाख ८४ हजार महिला मतदारांचा समावेश आहे. ६३५ मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
सहाव्या टप्प्यात समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या आझमगड लोकसभा मतदारसंघांसह भाजप खासदार योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर मतदारसंघातही मतदान होणार आहे. त्यामुळे सहाव्या टप्प्यात या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. याशिवाय महूमध्ये गुन्हेगारी क्षेत्रातून राजकारणात आलेले आमदार मुख्तार अन्सारी आणि त्यांच्या मुलाचे भवितव्य आज मतपेटीत बंद होईल.
सहाव्या टप्प्यातील मतदानात महू, गोरखपूर, महाराजगंज, कुशीनगर, देवरिया, आझमगड, बलिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. आझमगड हा मुलायमसिंह यांचा मतदारसंघ आहे. २०१२ च्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने या मतदार संघातील विधानसभेच्या १० जागांवर विजय मिळवला होता. मात्र यंदा मुलायमसिंह यादव यांनी स्वतःच्याच मतदारसंघात एकही प्रचारसभा घेतली नव्हती. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात समाजवादी पक्षाची कामगिरी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदानाचा सहावा आणि सातवा टप्पा भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. पूर्वाचलमधील सहाव्या व सातव्या टप्प्यामध्ये कुर्मी, मौर्य, मल्लाह, निशाद, राजभर आदी महत्त्वपूर्ण जातींना स्वत:कडे वळविण्यासाठी अहमहमिका लागली आहे. या जातींच्या पाठिंब्यावरच भाजपची मदार असल्याचे मानले जाते.
