निरुपा रॉय यांचा मुलगा बेडरुमसाठी भांडतोय

बॉलिवूड चित्रपटांमधील आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या निरुपा रॉय यांच्या मुलांचं संपत्तीवरुन भांडण सुरु असून हे प्रकरण आता न्यायालयात पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हे भांडण सुरु आहे. निरुपा रॉय यांची मुलं योगेश रॉय आणि किरण रॉय यांच्यात हे भांडण सुरु असून हे प्रकरण मिटवण्यासाठी दोघेही न्यायालयाच्या पायरीवर चढले आहेत. निरुपा रॉय यांचे पती कमल रॉय यांच्या निधनानंतर नेपिअन्सी रोडवर असलेल्या या घरासाठी मुलांमध्ये भांडणं सुरु झाली होती.
निरुपा रॉय यांचा छोटा मुलगा किरण याने मोठा भाऊ योगेश संपुर्ण संपत्ती मिळवण्यासाठी आपल्याला धमकावत असल्याचा आरोप केला आहे. मुख्य म्हणजे हे भांडण संपुर्ण संपत्तीसाठी नसून निरुपा रॉय यांच्या खासगी बेडरुमवरुन सुरु आहे. किरण आणि योगश दोघे आणि त्यांचं कुटुंब अॅम्बेसी अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील चार बेडरुम फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहे. निरुपा रॉय यांनी 1963 मध्ये 10 लाखाहूनही कमी किंमतीत हे घर विकत घेतलं होतं.
आपला मोठा भाऊ योगेश सर्व संपत्ती हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचं किरणचं म्हणणं आहे. ‘योगेश कधीच आई – वडिलांसोबत व्यवस्थित वागला नाही, त्यामुळे त्याला संपत्तीचा भागीदार नाही बनवलं’, असंही किरणने सांगितलं आहे.
‘आईच्या निधनानंतर मी वडिलांची काळजी घेतली. त्यांच्या बेडरुममध्ये मी राहावं अशी त्यांची इच्छा होती. याबद्दल त्यांनी माझा भाऊ आणि त्याच्या कुटुंबाला स्पष्ट सांगितलं होतं. पण आता योगेशला संपत्तीचा वाटा पाहिजे’, असं किरणने सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *