206 कोटींच्या चिक्की घोटाळ्यात नाव आल्याने, राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ब्लॉग आणि फेसबुकद्वारे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. एक रूपयाची मिंदी असेल तर मंत्रालयच काय राजकारणातून कायमची बाहेर जाईन, असा पवित्रा पंकजा मुंडे यांनी घेतला आहे.
सर्व आरोपांची उत्तरं देण्यास तयार आहे. मात्र माझ्या अनुपस्थितीत माझ्या आईच्या दारात निदर्शने करणाऱ्यांना परिपक्व कसं म्हणावं, असा सवाल पंकजा मुंडेंनी उपस्थित केला आहे.
काय आहे प्रकरण?
मंत्री पंकजा मुंडे यांच्या खात्यानं एका दिवसात तब्बल 206 कोटींची खरेदी केल्याचं समोर आलं. चिक्की, चटई, डिशेस, पुस्तकं अशा साहित्याची ही खरेदी आहे. त्यासाठी 13 फेब्रुवारी रोजी एका दिवसात 24 आदेश काढले गेले. त्यामुळे ही घाई नेमकी कशासाठी असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवाय अशा प्रकारच्या खरेदीत सरकारी नियमांचा भंगही झाला आहे. कारण 3 लाखांच्या वरची खरेदी असेल तर त्यासाठी ई-टेंडर काढावेत असा निर्देश आहे. मात्र पंकजा यांनी या नियमाचं देखील उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे.

