आकोलकर, पवार यांच्यावर ५ लाखांचे इनाम

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष गुन्हे शाखेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणारे सारंग आकोलकर व विनय पवार या दोघांवर प्रत्येकी पाच लाखांचे इनाम जाहीर केले. शाखेचे अतिरिक्त  पोलीस अधीक्षक एस. आर. सिंग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

दाभोलकर हत्याकांडाचा तपास सीबीआयच्या विशेष शाखेकडून सुरू आहे. याप्रकरणी गेल्या वर्षी जून महिन्यात पनवेल येथून सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक करण्यात आली होती. पुणे येथील न्यायालयात त्यांच्याविरोधात आरोपपत्रही दाखल करण्यात आले. तावडे यांच्याकडील चौकशी आणि आतापर्यंत केलेल्या तपासावरून दाभोलकर यांच्यावर गोळया झाडणारे आकोलकर आणि पवार होते, या निष्कर्षांवर सीबीआय पोहोचले आहे. सीबीआयच्या या विशेष शाखेने पनवेल, पुण्यासह, पश्चिम महाराष्ट्र आणि गोव्यात अनेक ठिकाणी धाडी घालून या दोन्ही मुख्य आरोपींचा शोध घेतला. पण अद्यापपर्यंत या दोघांच्या ठावठिकाण्याबाबतची नेमकी माहिती गोळा करण्यात सीबीआयच्या पदरी फारसे यश आलेले नाही. मध्यंतरी आकोलकर याच्या पुणे येथील निवासस्थानी सीबीआयने धाड घातली होती. धाडीच्या काही दिवस आधी आकोलकर आपल्या घरी येऊन गेल्याची माहिती सीबीआयला मिळाली होती.

सीबीआयच्या विशेष शाखेने जारी केलेल्या पत्रकात दोन्ही आरोपींची छायाचित्रे आहेत. या दोघांबाबत माहिती असल्यास किंवा या छायाचित्रांशी मिळत्याजुळत्या व्यक्ती पाहण्यात आल्यास सीबीआयच्या बेलापूर येथील कार्यालयात २७५७६८२०/ २७५७६८०४/  ८४२५८३२९५५ या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जी व्यक्ती या दोन्ही आरोपींबाबत संपूर्ण माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपयांचे इनाम घोषित करत आहोत, असे नमूद करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव व तपशील गुप्त ठेवण्यात येईल, असेही सीबीआयने कळवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *