अत्यंत किरकोळ गोष्टीवरून शेजाऱ्या- शेजाऱ्यांमध्ये घडलेल्या वादात एका महाविद्यालयीन तरुणीचा अंत झाला. ही घटना गोरेगाव पश्चिमेकडील मोतीलाल नगर १ येथे सोमवारी रात्री घडली. मेघना आगवणे (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. शेजाऱ्यांसोबत झालेल्या बाचाबाचीत ती खाली पडली. भांडणादरम्यान रागाच्या भरात घरगुती चाकू घेऊन बाहेर आलेले तिचे वडील राजेश धडपडले आणि चाकूसह मेघनाच्या अंगावर पडले. चाकू तिच्या छातीत रुतला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच मेघनाचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी एकूण सात जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती उपायुक्त विक्रम देशमाने यांनी दिली. त्यात वडील राजेश यांच्याविरोधात निष्काळजीपणे मेघनाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तसेच वाद घालणाऱ्या सहा शेजाऱ्यांविरोधात दंगलीच्या गुन्ह्य़ाची नोंद करण्यात आल्याचे गोरेगाव पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.मोतीलाल नगरातील बुद्धविहाराजवळील चाळीत आगवणे कुटुंब वास्तव्यास आहे. सोमवारी सकाळी मेघना, तिची बहीण पूजा यांच्यासोबत शेजाऱ्यांनी सांडपाणी टाकण्यावरून वाद घातला. वाद मारहाणीपर्यंत पोहोचला. गोरेगाव पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या व्यक्तींविरोधात परस्परविरोधी अदखलपात्र गुन्ह्य़ाची नोंद घेण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आगवणे भगिनी व शेजाऱ्यांना पुन्हा वाद घालू नका, अशी समज देत सोडले. रात्री पुन्हा त्यांच्यात वाद उफाळला. शेजाऱ्यांसोबतच्या बाचाबाचीत पूजा व मेघना खाली पडल्या, तर वडील राजेश यांनी रागाच्या भरात स्वयंपाकघरातील चाकू सोबत घेत वादात उडी घेतली. मात्र तेही धडपडले आणि खाली पडले. नेमके त्यांच्या हातातील चाकू मेघनाच्या शरीरात घुसला. त्यानंतर जखमी मेघनाला सिद्धार्थ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. माद्ध उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मेघना अकरावीत शिकत होती. या घटनेने मोतीलाल नगरात सध्या दु:खद वातावरण आहे.
