९ वाजेपर्यंत उत्तर प्रदेशात १०.७७ टक्के मतदान

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळापासून सुरूवात झाली. ११ जिल्ह्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघांमध्ये हे मतदान होत आहे. यामध्ये अयोध्या, अमेठी, सुलतानपूर, भरीच आणि श्रवस्ती मतदारसंघांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात एकुण सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. ८ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यानंतर ११ मार्च रोजी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यांसह उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. यापूर्वी झालेल्या चौथ्या आणि तिसऱ्या टप्प्यात तब्बल ६१ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या निकालांचा उत्तर प्रदेशच्या आगामी मतदानावर प्रभाव पडण्याची शक्यता व्यक केली जात आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी सुरक्षेच्यादृष्टीने या भागात निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. येथील १६०० भागांतील २३०० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. याशिवाय, १,७९२ मतदान केंद्रांवर वेब कास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाचव्या टप्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये ४० महिलांसह एकुण ६०७ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ८१ लाख मतदार या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील. यामध्ये पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तीन लाख मतदारांचा समावेश आहे. या मतदारांचा कौल सर्व राजकीय पक्षांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *