युद्धाला तोंड फुटले आहे, लढाई सुरूच राहील ; शिवसेनेचा भाजपला इशारा

मुंबईत भाजपने ८२ जागा पटकावून दुसरे स्थान पटकावल्यानिमित्त शिवसेनेचे त्यांचे अभिनंदन केल आहे. परंतु सत्ता आणि संपत्तीच्या बळावर त्यांनी ही मुसंडी मारल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. सेनेचा पराभव टाळण्यासाठी भाजपने दिल्लीची कुमक व सर्व साधनांचा वापर केला असला तरी शिवसेना ही योद्धाप्रमाणे लढली. असंख्य घाव झेलूनही शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेने हातातून निसटू दिला नाही. परिणामांची पर्वा न करता ही लढाई सुरूच राहील, असे म्हणत युद्धाला तोंड फुटल्याचा भाजपला इशारा दिला आहे. ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून त्यांनी महापालिका निवडणुकीतील भाजप व सेनेच्या कामगिरीवर भाष्य केले आहे. शिवसेनेच्या इशाऱ्यामुळे येणाऱ्या काळात भाजप-सेना युतीच्या भवितव्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या सत्तेला व भगव्याला सुरुंग लावून महाराष्ट्र अस्थिर करण्याचा हा कारस्थानी प्रयत्न असल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.
काँग्रेस सत्तेवर असताना हा लाभ काँग्रेसला मिळत तीच ऊब आता भाजपला मिळत आहे. शिवसेनेने निखाऱ्यावरून चालण्याचा मार्ग स्वीकारला असून आम्ही परिणामांची पर्वा करत नसल्याचे त्यांनी म्हटले. आता हा लढा फक्त सत्तेसाठी नाही तर धर्म, विचारांसाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठीच असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. संपूर्ण देश मुंबईत सामावला असला तरी मुंबईवर भूमिपुत्रांचाच पगडा राहिला आहे. देशाचा कौल मुंबई-ठाण्याच्या जनतेने स्पष्ट केला असून येथे ‘मन की बात’ चालत नाही तर फक्त ‘काम की बात’ चालते.

शिवसेनेने मुंबईत विकासाचे काम केले, मुंबईचे सदैव संरक्षण केले. विश्वासाचे बीज पेरले, तोच विश्वास आज शिवसेनेला विजयाकडे घेऊन गेला. भाजपने ८२ जागा मिळवल्या असल्या तरी कोणत्याही परिस्थिती शिवसेनेचाच महापौर होईल, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला. या वेळी सर्वच भाषिकांनी शिवसेनेला मतदान केल्याचे सांगत भाजपला विशिष्ट जात, धर्म आणि प्रांताचे एकगठ्ठा मतदान झाले आहे. तेच निर्णायक ठरले याची खंत आहे. बहुमताचा संपूर्ण आकडा शिवसेनेस गाठता आला नाही. यापेक्षा मोठा आकडा गाठता आला असता.
मुंबईतील १२ लाख मतदारांची नावे गहाळ झाली व त्यातील बहुसंख्य मतदार मराठीच होते. हा ठरवून केलेला घोळ नाही का? असा सवाल शिवसेनेने उपस्थिती केला आहे. ठाणे महानगरपालिकेत भाजपला शिवसेनेचा पराभव करता आला नाही. सोलापुरातही शिवसेनेने चांगला आकडा गाठला आहे. विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती या महानगरपालिकांत भाजपने अपेक्षेप्रमाणे मुसंडी मारली आहे. नागपूर तर भारतीय जनता पक्षाचा गड आहे व तेथे नितीन गडकरी व मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिष्ठा पणास लागली होती. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांत भाजपने चांगली कामगिरी करून दाखवली हा काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का असल्याचे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *