मुंबईसह दहा महानगरपालिका आणि २६ जिल्हा परिषदांचा निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागणार आहे. हा निकाल कोणाच्या बाजूने असेल आणि कोणाच्या विरुद्ध असेल याची उत्सुकता दिवसभर व्हॉटसअॅपवर चालू होती.
कोणत्या महापालिकेत अथवा जिल्हा परिषदेला सत्ता मिळणार याचा फैसला होणार आहे. सर्वच ठिकाणी सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून संध्याकाळपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल. मिनी विधानसभेची निवडणूक म्हणून लढल्या गेलेल्या निवडणुकीच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.
मुंबई महापालिकेची मतमोजणी एकंदर २३ ठिकाणी होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगासह पोलीस प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. साधारण सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. पहिला निकाल अकरा-साडेअकरापर्यंत लागू शकेल. तर दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल जाहीर होईल, असा विश्वास निवडणूक आयोगाने व्यक्त केला आहे. या निवडणुकीच्या निकालाबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. या निवडणुकीत गेली २५ वर्षे वेगवेगळया सत्तेत राहिलेले शिवसेना-भाजपा हे मित्रपक्ष या निवडणुकीत एकमेकांच्या समोर दंड थोपटून उभे राहिले होते. भारतीय जनता पार्टीने मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे आणि पिंपरी-चिंचड महापालिका जिंकण्यासाठी गेल्या वर्षापासून तयारी सुरू केली होती.
मुंबई महापालिकेचा रणसंग्राम त्यामुळेच चांगलाच रंगला होता. या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याची तयारी केलेली असली तरी केवळ दाखविण्यासाठी युती करण्याबाबत दोन-तीन चर्चेच्या तुरळक फे-या पार पडल्या आणि अखेर उद्धव ठाकरे यांनी यापुढे कुणाशीही युती करणार नाही, अशी घोषणा करून स्वतंत्रपणे निवडणूक लढण्यासाठी रणशिंग फुंकले होते. त्यानंतर गेला एक-दीड महिना निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू होता. एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिकाटिप्पणी करण्यात आली होती.
दोन्ही पक्षांतील वातावरण इतके कलुषित झाले होते. आता शिवसेना भाजपाचा पाठिंबा काढून घेणार, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. शिवसेनेचे मंत्री राजीनामे खिशात घेऊन फिरत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात दोन्ही पक्षांची भूमिका जरा मवाळ झालेली पाहायला मिळाली.
मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिका आणि अकरा जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले असून त्यात १७ हजार ३३१ मतदारांचे भवितव्य पेटीबंद झाले आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी केली. या निवडणुकीत एकूण ३ हजार २१० जागांसाठी १७ हजार ३३१ उमेदवारांमध्ये लढत झाली. आता यातील कोण बाजी मारणार याचा फैसला आज होणार आहे.

