‘एक हजार रुपयाची नवीन नोट नाही’

नोटबंदीच्या निर्णयानंतर बंद झालेली एक हजार रुपयाची नोट आता नव्या रूपात चलनात येणार असल्याचे वृत्त केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी फेटाळून लावले आहे. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना नवीन नोट आणण्याचा कोणताही विचार नसल्याचे सांगितले आहे.

रिझर्व्ह बँक आणि सरकारने एक हजार रुपयाची नवी नोट चलनात आणण्याचा निर्णय घेतला असून आरबीआयने या एक हजार रुपयाच्या नोटेची छपाईही सुरू केल्याचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झाले होते. मात्र, शक्तीकांत दास यांनी एक हजार रुपयांची नवीन नोट चलनात आणण्याचा कोणताही विचार नसल्याचा खुलास केला.

‘एक हजार रुपयांची नवीन नोट चलनात आणण्याचा कोणताही विचार सरकारचा नाही. सध्या सरकारचे सर्वाधिक लक्ष ५०० रुपये आणि त्यापेक्षा कमी मुल्याचे चलन बाजारात आणण्याचे आहे,’ असे दास यांनी ट्विटरवर सांगितले आहे.

सरकार एक हजार रुपयांची नवी नोट चलनात आणणार असल्याची जोरदार चर्चा काही दिवस सुरू होती. सोशल मीडियावर या नोटांची खोटी छायाचित्रे ही फिरत होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *