चिलीमध्ये राहणाऱ्या एका 90 वर्षीय महिलेच्या पोटात 50 वर्षांचा भ्रूण असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे या महिलेलाही माहित नव्हतं की तिच्या गर्भात स्टोन बेबी आहे.
झालं असं की, ही महिला कुठेतरी पडली आणि ती जखमी झाली. उपचार करण्यासाठी ती रुग्णालयात गेली आणि तिथे तिचा एक्स-रे करण्यात आला. एक्स-रेचा रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनाही धक्का बसला. महिलेच्या गर्भात 50 वर्षांचा सुमारे दोन किलो वजनाचा एका मृतावस्थेतील भ्रूण होता.
या स्थितीला लिथोपेडियॉन म्हटलं जातं, ज्यात भ्रूण कॅल्सिफाईड होतं. भ्रूणाची वाढ गर्भाबाहेर झाल्याने अशी परिस्थित उद्भवते. गर्भाबाहेर वाढ झाल्याने भ्रूणाला पोषण मिळाल्याने ते मरतं. अशा भ्रूणाला स्टोन बेबी म्हणतात.
रुग्णालयाचे संचालक मार्को वार्गास लाजो यांचं म्हणणं आहे की, हे एक दुर्मिळ प्रकरण आहे. डॉक्टरांच्या मते महिलेचं वय जास्त आहे, त्यामुळे ऑपरेशन करुन भ्रूण बाहेर काढणं तिच्यासाठी धोकादायक ठरु शकतं. त्यामुळे ऑपरेशन न करताच तिला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
यापूर्वी ब्राझिलमधील एका महिलेच्या पोटातही 44 वर्षांचा स्टोन बेबी सापडला होता.
वैद्यकीय विश्वातील या प्रकरणामुळे कोणालाही धक्का बसेल. वैद्यकीय इतिहासात आतापर्यंत अशाप्रकारचे केवळ 300 प्रकरणं समोर आली आहेत. यावरुनच हे प्रकरण किती दुर्मिळ आणि अनोखं आहे, याचा अंदाज येतो.

