स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते आणि माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे यवतमाळ येथे निधन झाले. धोटे यांना पहाटे पाच वाजता शासकीय महाविद्यालयात हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याची प्राणज्योत मालवली.
जांबुवंतराव धोटेंच्या निधनाने विदर्भावर शोककळा पसरली आहे. विदर्भातील शेतकऱ्यांच्या समस्यांसोबतच इतर प्रश्नही धोटेंनी आक्रमकपणे मांडले. त्यामुळे त्यांना ‘विदर्भवीर’ असेही संबोधले जात होते.
महाराष्ट्राच्या विधानसभेवर ते पाच वेळा तर लोकसभेवर दोन वेळा निवडून आले होते. 2002 साली त्यांनी विदर्भ जनता काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती.
जांबुवंतराव धोटे यांच्याबाबतची माहिती
1958 : शारीरिक शिक्षण या विषयाचे शिक्षक म्हणून मनपाच्या शाळेत रुजू
1959 : जवाहरलाल दर्डांचा पराभव करुन नगरसेवकपदी
1962 : यवतमाळ विधानसभेत विजयी
1964 : विधानसभेच्या अधिवेशनात अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांना सभागृहात पेपर वेट फेकून मारला होता. दुष्काळी परिस्थितीवर बोलू न दिल्याने त्यांनी हे कृत्य केले. यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली होती. देशातील ही पहिलीच कारवाई होती.
1964 : डिसेंबरमध्ये धोटे यांची आमदारकी रद्द केल्याने पोटनिवडणूक झाली. त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून ते पुन्हा विजयी झाले.
1967 : महाराष्ट्र विधानसभेत आमदारपदी
1971 : नागपूर लोकसभा निवडणुकीत फॉरवर्ड ब्लॉककडून विजयी
1978 : यवतमाळ विधानसभेत आमदार
विधानसभेत काँग्रेससोबत युती, इंदिरा गांधींना महाराष्ट्रभर फिरून मदत केली. त्यावेळी फॉरवर्ड ब्लॉक काँग्रेस आघाडीत धोटे यांचे 19 आमदार निवडून आले होते.
1980 : काँग्रेसच्या तिकीटावर नागपुरातून खासदार म्हणून विजयी
