नगरसेवक मनोज म्हात्रे यांची भिवंडीत हत्या

भिवंडीत महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय वैरही उफाळून आले असून महानगरपालिकेतील नगरसेवक व काँग्रेसचे गटनेते मनोज म्हात्रे (५३) यांची मंगळवारी रात्री गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. रात्री साडेनऊच्या सुमारास येथील ओसवालवाडीमागे, कामतघर येथे त्यांच्यावर चार अनोळखी इसमांनी हल्ला केला.

रामनगर येथील समर्थक उमाशंकर ऊर्फ मुलायम यादव यांना विरोधकांनी धमकावल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी यासाठी मनोज म्हात्रे नारपोली पोलीस ठाण्यात गेले होते. तेथून ते ओसवालवाडी येथील राहत्या घरी आले असता दबा धरून बसलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने कोयत्याने हातावर केले व त्यांच्या छातीवर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या वर्मी लागल्याने ते जागीच कोसळले. त्यांना तातडीने ठाण्याच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. हल्लेखोर इंडिका कारमधून पळाल्याचे समजते. यापूर्वीही म्हात्रेंवर कामतघर येथे गोळीबार झाला होता. मनोज म्हात्रे हे २००२ पासून नगरसेवक असून त्यांनी दोनवेळा स्थायी समितीचे सभापतीपद भूषवले आहे. ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात. त्यांच्या हत्येनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *