हटके गिफ्टमुळे अटक झाल्याने मुंबईत तरुणाच्या प्रेमाची हवाच गुल!

व्हॅलेंटाईन डेला आपल्या प्रेयसीसाठी काहीतरी हटके करण्याचा प्रयत्न एका प्रियकराच्या अंगलट आला आहे. त्याने केलेल्या कृत्यामुळे संबंधित प्रियकराला पोलीस कोठडीची हवा खावी लागली असून, त्याच्या प्रेमाची हवाच गुल झालीये. आपल्या प्रेयसीला वेगळ्या स्वरुपाचे गिफ्टे देण्यासाठी प्रियकराने एका गाडीला २००० रुपयांच्या नोटा लावल्या होत्या. पण अशा पद्धतीने देशातील चलनाचा गैरवापर केल्यामुळे प्रियकराविरोधात मुंबईतील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियकराने ही गाडी मंगळवारी सकाळी मुंबईतील रस्त्यावर आणल्यानंतर लोकांचे त्याकडे लक्ष वेधले गेले. होंडा कंपनीच्या या गाडीवर सर्व ठिकाणी २००० रुपयांच्या नोटा लावल्या होत्या. ही गाडी रस्त्यावर आल्यानंतर लगेचच पोलिसांनी हस्तक्षेप करून गाडी बाजूला घेतली आणि गाडीच्या चालकाला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यावर त्याने प्रेयसीला व्हॅलेंटाईन डेचे गिफ्ट म्हणून अशा पद्धतीने गाडीवर नोटा लावल्याचे त्याने सांगितले. पण देशातील कायदेशीर चलनाचा गैरवापर केल्यामुळे पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. ही घटना मुंबईत घडली असली, तरी अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव काय, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 संपूर्ण देशभरात आज व्हॅलेंटाईन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे. आपल्या प्रेमाला मूर्त रुपाने व्यक्त करण्याचा हा दिवस. या निमित्त अनेक प्रेमीयुगुल वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करतात. तसेच दोघेही एकमेकांना वेगवेगळी गिफ्टही देत असतात. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बाजारात उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. ग्रीटिंग्स कार्ड, फुले, भेटवस्तू यांची मोठी उलाढाल झाल्याचे मुंबई आणि पुण्यातील बाजारपेठांमध्ये दिसले. मुंबईतील मरिन ड्राईव्ह, बॅण्डस्टॅण्ड येथेही प्रेमिकांची मोठी गर्दी मंगळवारी सकाळपासून पाहायला मिळते आहे. प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने ‘ती’ला किंवा ‘त्या’ला आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्येही हे चित्र पाहायला मिळते आहे. मात्र, अशा पद्धतीने हटके गिफ्ट देणे एका प्रेमिकाला चांगलेच महागात पडले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *