पंकजा मुंडे यांच्या विरोधात एसीबीकडे तक्रार

पंकजा मुंडे यांच्या विरोधात एसीबीकडे तक्रार

एकाच दिवसांत सर्व नियम धाब्यावर बसवून २०६ कोटी रुपयांची खरेदी केल्याप्रकरणी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली आहे. या खरेदीत मोठय़ा प्रमाणात गरव्यवहार व अनियमितता झाली असल्याने या विभागातील अधिका-यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

राज्यातल्या अंगणवाडय़ांना शिक्षणोपयोगी साहित्य, पौष्टिक आहार व इतर वस्तुंचा पुरवठा करताना महिला व बालविकास विभागाने नियमांचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी दुपारी ३ वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संचालक प्रवीणकुमार दीक्षित यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीत सावंत यांनी नमूद केले आहे की, या खरेदीमध्ये मान्यताप्राप्त नसलेल्या संस्थांना कंत्राटे देण्यात आली. तीन लाख रुपयांहून अधिक रक्कमेच्या खरेदीसाठी ई-निविदा काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. परंतु कोट्यवधी रुपयांची खरेदी निविदा न मागवता केवळ दरपत्रकाच्या आधारे करण्यात आली आहे. खरेदीचे प्रस्ताव १२ फेब्रुवारीला आयुक्तांकडे दाखल केले जातात आणि त्याला लगेच दुस-या दिवशी १३ फेब्रुवारीला मान्यता देण्यात येते हे संशायास्पद आहे, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

महिला व बालविकास विभागाने एकाच दिवशी एकंदर ११४.२७  कोटी रूपयांची चिक्की खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सूर्यकांता महिला व औद्योगिक सहकारी संस्थेला या खरेदीची मान्यता देताना सदर संस्थेची चिक्की उत्पादन क्षमता किती आहे किंवा ही संस्था नेमका कुठून चिक्की पुरवठा करणार, याचीही खातरजमा करण्यात आलेली नाही. मेसर्स भवानी इंटरप्रायजेस या संस्थेने ११ फेब्रुवारी रोजी प्लॅस्टिक चटई पुरविण्यासाठी १ हजार ४२२ रुपये प्रति चटई या दराने करार केला. १२ फेब्रुवारीला या संस्थेने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना खरेदीचा प्रस्ताव दिला. १३ फेब्रुवारी रोजी आयुक्तालयाने प्रतिअंगणवाडी २ याप्रमाणे १ कोटी ८० लाख ६२ हजार २४४ रुपयांच्या खरेदीचा प्रस्ताव प्रधान सचिव, महिला व बालविकास यांना सादर केला. या प्रस्तावाला त्याच दिवशी म्हणजे १३ फेब्रुवारीला मंजुरी देत खरेदीचा आदेश देण्यात आला.

मेसर्स जगदगुरु प्रिटींग प्रा.लि., नवी मुंबई या संस्थेच्या नावाने अंगणवाडी सेविकांसाठी एमआयएस मार्गदर्शिका व मुख्य सेविकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका खरेदी करण्यातबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानुसार या संस्थेला १ कोटी ६ लक्ष रूपये किंमतीच्या पुस्तिकांचा पुरवठा करण्याचा आदेश देण्यात आला. तथापि प्रस्तावासोबतच्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता सदर एमआयएस मार्गदíशका व मुख्य सेविकांसाठी मार्गदर्शक पुस्तिका या दोन पुस्तकांचे केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयामार्फत कॉपीराईट रजिस्ट्रेशन भानुदास पी. टेकावडे यांच्या नावे आहे. म्हणजेच मेसर्स जगदगुरु प्रिंटींग प्रा.लि. यांच्या नावे कोणतीही कॉपीराईट रजिस्ट्रेशन नसताना त्यांना पुरवठा आदेश देण्यात आलेले आहेत. मेसर्स जगदगुरु पिंट्रींग प्रा.लि. यांच्या नावे कोणतेही कॉपीराईट रजिस्ट्रेशन नसताना त्यांना कलाचेतना कॉपी, कलिरग कृती पुस्तिकेसाठी ४ कोटी १ लक्ष ८० हजार ६५६ रुपयांचे  पुरवठा आदेश देण्यात आल्याचे सचिन सावंत यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *