पंकजा मुंडेंच्या खात्याकडून एकाच दिवसात २०६ कोटींची खरेदी

पंकजा मुंडेंच्या खात्याकडून एकाच दिवसात २०६ कोटींची खरेदी

एकाच दिवसात तब्बल २०६ कोटींची खरेदी केल्याच्या कारणावरून राज्याच्या महिला आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील पहिला मोठा घोटाळा म्हणून या सर्व प्रकाराकडे पाहिले जात असून त्यामुळे विरोधकांना भलतेच स्फुरण चढले आहे.
पंकजा मुंडे यांच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने अनेक निकष व नियम धाब्यावर बसवत एकाच दिवसात २०६ कोटींची खरेदी केल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. खरेदी केलेल्या वस्तुंमध्ये चिक्की, चटई, डिशेस आणि पुस्तके या गोष्टींचा समावेश आहे. १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या या खरेदीसाठी एकाच दिवसात २४ अध्यादेश काढण्यात आले होते. हा राज्य सरकारच्या आजपर्यंतच्या इतिहासातील विक्रम आहे. तीन लाखांपेक्षा अधिक रक्कमेची कोणतीही सरकारी खरेदी ई-निविदेच्या माध्यमातून केली जावी, असा सरकारी नियम आहे. य़ाशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच दर पद्धतीने निविदा निश्चित करण्याच्या प्रकारावर बंदी घातली होती. विशेष म्हणजे खरेदी केलेल्या या साहित्यामधील आदिवासी मुलांना वाटप करण्यात आलेल्या चिक्कीच्या निकृष्ट दर्जावरून हे प्रकरण उघडकीस आले. अहमदनगरच्या जिल्हाध्यक्ष मंजुश्री गुंड यांनी याप्रकरणी पत्र लिहून पंकजा मुंडे यांच्याकडे तक्रार केली होती. आदिवासी मुलांना देण्यात आलेल्या चिक्कीत चिकणमाती असल्याची तक्रार गुंड यांनी पत्रात केली होती.

महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या घेण्यात आलेले आक्षेप:

* एकाच दिवसात २४ अध्यादेश काढण्याचा विक्रम
* नवी मुंबईच्या जगतगुरु कंपनीकडून ५ कोटी ६० लाखाच्या वह्यापुस्तकांची खरेदी. या खरेदीचा धनादेश संबंधित कंपनीच्या नावे काढला जाणे आवश्यक होते. मात्र, या व्यवहाराची रक्कम थेटपणे भानुदास टेकवडेंच्या वैयक्तिक खात्यात जमा करण्यात आली.
* बालविकास आयुक्त विनिता सिंघल यांनी नाशिकच्या एव्हरेस्ट कंपनीकडून वॉटर फिल्टर खरेदी करण्यास अनुमती. वॉटर फिल्टर्सची किंमत ४ हजार ५०० रुपये असताना, पंकजा मुंडेंनी ती ५ हजार २०० पर्यंत वाढवण्यास अनुमती दिली. या एव्हरेस्ट कंपनीचा स्वत:चा उत्पादन प्रकल्प नसतानाही त्यांच्याकडून ही खरेदी करण्यात आली.
* शासनाला कोणतीही माहिती न देता सिंधुदुर्गच्या सूर्यकांता सहकारी महिला संस्थेला चिक्की पुरवठ्याचे कंत्राट. मात्र, केंद्रीय खरेदी आयुक्त राधिका रस्तोगींनी खरेदीची रक्कम ३ लाखांपेक्षा जास्तीची असल्याने ई-निविदेचा पर्याय अवलंबिण्याचा निर्णय घेतला. पण पंकजा मुंडेंनी परस्पर हस्तक्षेप करुन सूर्यकांता सहकारी महिला संस्थेला ८० कोटींच्या चिक्की पुरवठ्याचे कंत्राट दिले.
* कुपोषित मुलांच्या तपासणीसाठी साई हायटेक आणि नितीराज इंजिनिअर्स या दोन कंपन्यांना २४ कोटींचे कंत्राट देण्यात आले. विशेष म्हणजे या दोन्ही कंपन्या उत्तर महाराष्ट्रातील आहेत.
* औषधांच्या किटसाठी ५०० रुपयाची तरतूद आहे. पण कंत्राटदाराने ७२० रुपये किंमत लावली. त्यामुळे ही खरेदी नियमात बसवण्यासाठी किटमधील औषधांची संख्या कमी कऱण्याची शक्कल वापरण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *