अतृप्त आत्म्यासोबत शरीर संबंध ठेऊन त्याला तृप्त केले तर तो प्रसन्न होऊन आपण म्हणू ते कार्य करतो. अगदी पैशांचा पाऊसही पाडतो. त्यासाठी लोणावळा येथील महाराजांसमोर नग्न अवस्थेत बसावे लागेल, असे सांगून एका महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न करणा-या भोंदूबाबाविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलेबरोबरच अनेक तरुण मुलींचे शारीरिक शोषण करण्याचा डाव सहकारनगर पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रेमंड सॅम्युअल फ्रँकलिन (रा. नांदेड सिटी), शेख झहीर अब्बास (रा. चिंचवड), रेश्मा रामदास पाडळे (रा. चराडे वस्ती, वडगाव धायरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धनकवडीमध्ये राहणा-या एका महिलेने फिर्याद दिली आहे.
सहकारनगर पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन अधिनियम ३ (१), (२) व अनतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम (१) (क), (ग), (घ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा सर्व प्रकार बुधवार ते शुक्रवारदरम्यान सहकारनगर येथील गणपती मंदिर तसेच सारसबागेत घडला.
पीडित महिलेच्या एका मैत्रीणीमार्फत रेश्माशी तिची ओळख झाली होती. रेश्मा हिच्यासोबत अधुनमधुन त्यांचे फोनवर बोलणे होत होते. १ फेब्रुवारी रोजी रेश्माने पीडित महिलेला फोन करुन भेटायला बोलावले.
त्यानुसार, ही महिला सहकारनगर पोलीस ठाण्याजवळ असलेल्या गणपती मंदिराजवळ रेश्माला भेटली. रेश्माने रेमंड याच्याशी तिची ओळख करुन दिली. त्यावेळी रेमंड याने तिला ‘माझ्या ओळखीचा एक महाराज आहे. तो पैशांचा पाऊस पाडतो, त्याला एक तरुण मुलगी जिच्या शरीरावर कोठेही गोंदण नाही, तिळ नाही, शस्त्रक्रिया झालेली नाही, सुंदर अशा मुली हव्या आहेत. अशा चार मुली बघून दे. त्याबदल्यात २० लाख रुपये देतो.
महाराजांना मी एक मुलगी दिली तर मला दहा लाख रुपये मिळाले.’ अशी बतावणी त्याने केली. त्यानंतर मंदिरातच त्याने विविध पोझमध्ये पीडित महिलेचे फोटो काढले. त्यानंतर रेमंडने शुक्रवारी पुन्हा फोन करुन सारसबागेत भेटायला बोलावले.
सारसबागेमध्ये त्याने आरोपी शेख जहीर अब्बास याच्याशी तिची ओळख करुन दिली. त्यावेळी शेख याने ‘लोणावळ्यातील महाराजांकडे मुली पाठवायच्या असून ते सर्व मुलींना एका खोलीमध्ये नग्नावस्थेत पाहतात. त्यांच्यासमोर बसवून होम करतात. त्यानंतर थोड्यावेळात एक जीन (आत्मा) तेथे येतो आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करतो. त्या वेळात पैशांचा पाऊस पडत राहतो. तुम्हाला हवे तेवढे पैसे तुम्ही घेऊन जाऊ शकता. या प्रकाराला महिलेने होकार देऊन घर गाठले.
याबाबत शनिवारी रात्री त्यांनी ओळखीच्या सामाजिक कार्यकर्त्यां असलेल्या नंदाताई ढावरे यांना सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी ढावरे यांनी अशा प्रकारे कधीही पैशांचा पाऊस पडत नसतो. अशा प्रकारे पैशांच्या आमिषाने महिला व मुलींची फसवणूक करुन बलात्कार केले जातात. तसेच ब्लॅकमेल केले जाते असे त्यांनी समजावून सांगितले.
झालेला प्रकार लक्षात येताच ढावरे यांच्यासह संबंधित महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ निरीक्षक दीपक निकम यांनी सर्व हकीकत ऐकल्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला. पुढील तपास निरीक्षक (गुन्हे) आप्पासाहेब वाघमळे करीत आहेत.
