ओझर पिंपळगाव ते द्वारका सर्कल परिसरातून लिफ्टच्या निमित्ताने तर कधी प्रवासी म्हणून कारमध्ये बसवून प्रवाशांना मारहाण करून लुटणारी तीन जणांची टोळी नाशिकमध्ये सक्रिय होती. पिंपळगाव बसवंत येथील या टोळीतील तीन सराईत गुन्हेगारांना नाशिक ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने नांदगाव परिसरातून अटक केली आहे.
या वेळी नाशिक, ओझर, पिंपळगाव याठिकाणी केलेल्या चार गुन्ह्यांची कबुली या संशयितांनी केली आहे. त्यांच्याकडे अल्टो कार, चोरीचे मोबाइल व रोख रकमेसह २ लाख ६६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रवाशांना अशा पद्धतीने लुटणारे हे संशयित मनमाड-नांदगाव रोडने लाल रंगाच्या अल्टो कारमधून येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळाली होती़.
त्यानुसार शाखेचे पोलीस कर्मचारी नांदगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना ही कार आढळून आली. पोलिसांनी या कारचा पाठलाग करत हॉटेल खुशबू गार्डनजवळ कार अडवली. यामधील या तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले़.
या कारवाईत सराईत गुन्हेगार प्रतीक पांडुरंग मातेरे (रा.पिंपळगाव बसवंत), रोहित केशव गायकवाड (रा. पिंपळगाव बसवंत) व रवींद्र दादाश्री केदारे (रा. पिंपळगाव एमआयडीसी, गोंडेगाव) यांना ताब्यात घेण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखा पथकातील पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, बालाजी मुसळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक अरुण पगारे, व कर्मचा-यांनी ही कारवाई केली.
