एक कोटी बँक खात्यांची होणार चौकशी

देशात नोटाबंदीनंतर मोठय़ा रकमा हातात असलेल्या अनेक खातेधारकांनी प्रामाणिकपणे आपले घामाचे, कष्टाचे पैसे बँकेत भरले, मात्र जनतेच्या इतक्या छळाने समाधान न झालेल्या सरकारने इन्कम टॅक्स विभागाच्या माध्यमातून आता पुन्हा एक कोटी बँक खात्यांची यादी तयार केली असून या खात्यांशी संबंधित १८ लाख लोकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

नोटाबंदीच्या काळात मोठय़ा रकमा बँकेत भरल्यामुळे या खातेधारकांची चौकशी होणार असून हे पैसे कुठून आले? याचा हिशोब खातेधारकांना द्यावा लागणार आहे. मात्र मुळात ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, त्यांनी हा पैसा बँकेत भरलेलाच नसून बाहेरच्या बाहेर कमिशन देऊन नोटा बदलून घेतल्याचे अनेक प्रकरणांवरून पुराव्यासह स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ज्यांचे कष्टाचे पैसे होते, त्यांना त्रास देण्याचा सरकारचा हा आणखी एक प्रयत्न असल्याची भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

देशात ८ नोव्हेंबर रोजी रात्री ५०० आणि १ हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. यानंतर १० नोव्हेंबरपासून जुन्या नोटा असलेल्यांना या नोटा बदलून घेणे आणि स्वत:च्या खात्यात भरणे याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

नोटाबंदी झाली, त्यावेळी अनेक रोखीने व्यवहार करणारे व्यावसायिक, दुकानदार, उद्योजक यांच्याकडे मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम जमा झाली होती. ही रक्कम त्यांनी प्रामाणिकपणे स्वत:च्या बँक खात्यात भरली, मात्र यानंतर आता ज्यांनी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खात्यात भरली आहे, त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे इन्कम टॅक्स विभागाने म्हटले आहे.

यानुसार देशातील १ कोटी बँक खात्यांची यादी तयार करण्यात आली असून १८ लाख खातेदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नोटाबंदीनंतर झालेला त्रास कमी होता, म्हणून हा द्राविडी प्राणायाम पुन्हा मागे लावला आहे का? असा संतप्त सवाल करण्यात येत आहे.

पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम हाती असणे गैर?

देशभरात अनेक मोठमोठी दुकाने, व्यापारी, ज्वेलर्स, उद्योजक, आस्थापना यांना दैनंदिन व्यवहारांसाठी रोख रक्कम लागत असून त्यांच्याकडे ५ ते १० लाख रुपये ‘कॅश इन हॅण्ड’ स्वरूपात ठेवलेले असतात. शिवाय अनेकांचा दिवसाला गल्ला तितका असतो. त्यामुळे अचानक बँका बंद झाल्यावर घोषित झालेल्या नोटाबंदीनंतर अशा व्यापा-यांनी हे पैसे १० नोव्हेंबरनंतर बँकेत जमा केले. हे पैसे बेहिशोबी असते, तर बँकेत भरण्यात आले नसते.

बेहिशोबी पैसे बाहेरच्या बाहेर बदलून घेण्याचीही अनेक प्रकरणे इन्कम टॅक्स, पोलीस, ईडी यांनी उघड केली असून यात बँकेच्या अधिका-यांनाही अटक झाली आहे. मात्र ज्यांनी प्रामाणिकपणे स्वत:चे कष्टाचे पैसे बँकेत भरले, त्यांना आता त्रास देण्याचे हे काम सुरू असल्याची टीका सर्वसामान्यांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *