केंद्रीय भुपृष्ठ आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी हे बुधवारी हेलिकॉप्टर अपघातातून बचावले. हेलिकॉप्टरच्या वैमानिकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टचा गंभीर अपघात होता होता टळला. गडकरी पश्चिम बंगाल येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना हा प्रकार घडला. कार्यक्रमाच्याठिकाणी गडकरींचे हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तात्पुरते हेलिपॅड तयार करण्यात आला होता. यासाठी ताडपत्री आणि कार्पेटच्या आच्छादनाचा वापर करण्यात आला होता. मात्र, हेलिकॉप्टर उतरतेवेळी निर्माण झालेल्या जोरदार वाऱ्यामुळे हे कार्पेट हवेत उडायला लागले. कार्पेटचा काही भाग हेलिकॉप्टरच्या पंख्यापर्यंत जाऊन पोहचला. त्यामुळे काही वेळासाठी गंभीर अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर जमिनीवर न उतरवता पुन्हा हवेत उडवले आणि उडणाऱ्या कार्पेटपासून दूर नेले आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
नितीन गडकरी हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

