महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरण्याचा आज (शुक्रवार) शेवटचा दिवस उजाडला तरी भाजपा, शिवसेना आदी प्रमुख पक्षांकडून उमेदवार यादीबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्यात येत आहे. सुरुवातीला नाराजांच्या बंडखोरीचे कारण सांगत पक्षांनी यादी जाहीर करण्यास टाळाटाळ केली. त्यातच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांची मुले, बायका आणि पाहुण्यारावळ्यांना तिकिटे वाटण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले. जबाबदारी उचलायला कार्यकर्ते हवेत, परंतु तिकीट द्यायच्या वेळी मेहुणे आणि पाहुणे आठवतात, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहेत.
स्वबळावर पालिका काबीज करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेना आणि भाजपाने उमेदवार यादी जाहीर न करता थेट एबी फॉर्म वाटण्याचे धोरण स्वीकारले आहे. मात्र, काही प्रभागांमध्ये मंत्री आणि आमदार, खासदारांची मुले, पाहुणेरावळ्यांना एबी फॉर्म देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. एरव्ही काँग्रेसच्या घराणेशाहीविरोधात गळे काढणाऱ्या भाजपानेही मुंबईत नेते मंडळींना झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाले आहे. तिकिटाचा वाद टाळण्यासाठी पक्षाने अद्याप अधिकृतपणे यादीही जाहीर केली नाही. मात्र, भाजपाच्याच एका पदाधिकाऱ्याने ७२ उमेदवारांची यादी फोडल्याने भाजपाच्या नेत्यांचा डाव उघड झाला आहे. मुंबई भाजपाध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी उमेदवार निवड प्रक्रियादेखील पारदर्शीपणे पार पाडणार असल्याचे वक्तव्य केले होते. प्रत्यक्षात मात्र सारा सावळा
गोंधळ असल्याचेच चित्र समोर आले आहे.
मुलाला तिकीट मिळवून देणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आपल्या स्वीय साहाय्यकाच्या (पीए) बायकोलाही तिकीट मिळेल याची व्यवस्था केली. प्रभाग क्रमांक ११६मधून सोमय्या यांचे पीए दीपक साळवी यांची पत्नी साक्षी साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, राज्यमंत्री विद्या ठाकूर यांचा मुलगा दीपक ठाकूर गोरेगावमधून प्रभाग क्रमांक ५०वर निवडणूक लढविणार आहे.
आमदार अमित साटम यांचे मेहुणे रोहन राठोड यांना प्रभाग क्रमांक ६८मधून तर आमदार भारती लव्हेकर यांचा भाचा योगीराज दाभोळकर यांना प्रभाग ६०मधून उमेदवारी बहाल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय मुंबई महापालिकेतील भाजपा नगरसेवक विठ्ठल खरटमोल यांची पत्नी रुक्मिणी यांना प्रभाग १४८मधून उमेदवारी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पक्षाने अधिकृतपणे उमेदवारी यादी जाहीर करण्यापूर्वी सोशल मीडियात यादी झळकली. या प्रकरणाची पक्षाने गंभीर दखल घेतली असून त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.
वॉर्डांमध्ये संतापाचे वातावरण
– माजी मंत्री, आमदार राज पुरोहित यांचा मुलगा आकाश पुरोहित यांना प्रभाग क्रमांक २२१मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर, खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्याला तिकीट देण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक १०८मधून नील सोमय्या निवडणूक लढविणार आहेत. नील यांच्या उमेदवारीने संतापाची भावना आहे.
– जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षांची दावेदारी मोडून नीलला प्राधान्य देण्यात आले. मुलाला तिकीट मिळवून देणाऱ्या सोमय्या यांनी आपल्या स्वीय साहाय्यकाच्या (पीए) बायकोलाही तिकीट मिळेल याची व्यवस्था केली. प्रभाग क्रमांक ११६मधून सोमय्या यांचे पीए दीपक साळवी यांची पत्नी साक्षी साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
