वनपुरुष जादव पायेंग यांचं स्वप्न लवकरच साकार होण्याची चिन्हं आहेत. कारण केंद्र सरकार लवकरच ‘एक मूल एक झाड’ ही योजना आणण्याच्या विचारात आहे. लहान वयातच मुलांमध्ये झाडांबद्दल आपुलकी आणि पर्यावरण रक्षणाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी ही योजना लागू केली जाणार आहे.
या योजने अंतर्गत शाळांमध्ये नर्सरी तयार केली जाईल. तिथे ही मुलं झाडं लावतील. हे एवढ्यावरच थांबणार नाही तर या मुलांना हे झाड 10 महिन्यांपर्यंत वाढवावं लागेल. यानंतर ही मुलं झाडं स्वत:च्या घरी किंवा हवं त्या जागी लावू शकतात.
यावर्षी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवला जाईल आणि मिळालेल्या प्रतिसादानंतर संपूर्ण भारतात ही योजना लागू करण्याची तयारी सरकारनं केली आहे.
काही दिवसांपूर्वी वनपुरुष जादव पायेंग यांची कहाणी दाखवली होती. त्यावेळी जादव पायेंग यांनी मुलांना शाळेपासूनच झाडं लावण्यास प्रवृत्त करायला हवं असं सांगितलं होतं. यानंतर केंद्रानं उचललेलं हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद म्हणावं लागेल.

