संजय लीला भंसाळी निर्मित पद्मावती चित्रपटावरून सुरू असलेल्या वादात आता केंद्रीय राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी उडी घेतली आहे. चित्रपटाला विरोध करत त्यांनी राणी पद्मावती या हिंदू होत्या. त्यामुळेच त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप केला. तसेच हिंदू देवतांवर चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांमध्ये मोहम्मद पैगंबर यांच्यावर चित्रपट बनवण्याची हिमत नसते, असेही त्यांनी म्हटले आहे. जे लोक भारताचा चुकीचा इतिहास दाखवत असतील तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे, असेही ठणकावले. येथील खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
औरंगजेब, टीपू सुलतानला आपला आयकॉन मानणारे लोक देशातील इतिहासाशी खेळत आहेत. हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असल्याचे ते म्हणाले. पद्मावती यांचे चरित्र ज्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. जर त्या हिंदू नसत्या तर कोणीही त्यावर चित्रपट बनवण्याची हिंमत दाखवली नसती, असे ते म्हणाले. ज्यांनी असे केले आहे. त्यांनी भारतीय इतिहासाची मोडतोड केली आहे. पद्मावती यांनी स्वत:ला संपवले. परंतु मुघलांसमोर गुडघे टेकले नाहीत. त्यासाठी अशा लोकांना जनतेनेच शिक्षा दिली पाहिजे.
हिंदु देवदेवतांवर सातत्याने वक्तव्ये केली जातात. पीके सारखे चित्रपट बनतात. परंतु मोहम्मद पैगंबर यांच्यावर चित्रपट बनवण्याची कोणाची हिंमत आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. जनतेसमोर हे एक मोठे आव्हान आहे. त्यांनीच याबाबत निर्णय घ्यावा.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय भंसाळी हे राजपूत महाराणी पद्मावती यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटात राणी पद्मावती व अल्लाउद्दीन खिलजी यांच्याबाबत चुकीचे तथ्ये दाखवल्याचा आरोप आहे. राजस्थान येथे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना करनी सेना नावाच्या संघटनेने चित्रीकरणस्थळी तोडफोड करत भंसाळी यांना मारहाण केली होती.
