‘जुनी पेन्शन योजना’ ठरतेय चर्चेचा मुद्दा

राज्यातील १ नोव्हेंबर २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, ही मागणी शिक्षक मतदार संघात प्रचाराचा मुद्दा ठरला आहे. शिक्षक परिषदेने या मुद्द्यावरून आक्रमक पवित्रा घेतल्याने शिक्षणमंत्र्यांची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे.

शिक्षक परिषदेचे उमेदवार वेणुनाथ कडू यांनी विविध शाळांमध्ये संवाद साधताना हा मुद्दा उचलून धरला आहे. जुन्या पेन्शनसाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे कडू यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले की, १० डिसेंबर २०१६ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी शिक्षकांनी धरणे दिले होते. त्यावेळी नागपूरचे शिक्षक आमदार नागोजी गाणार यांचा अपवाद वगळता राज्यातील एकही शिक्षक आमदार या आंदोलनाकडे फिरकला नव्हता. यावरून शिक्षकांच्या प्रश्नांबाबत विद्यमान शिक्षक आमदार गंभीर नसल्याचे म्हणत कडू यांनी बंडखोर उमेदवार रामनाथ मोते यांना चिमटा काढला. २००५ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही कडू यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *