भारताकडून पहिला टी-२० व दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारा काश्मिरी फिरकीपटू परवेज रसूलने आपल्या वर्तणुकीमुळे वाद ओढावून घेतला आहे. गुरूवारी कानपूर येथे इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी निवडण्यात आलेला रसूल सामन्यापूर्वी आयोजित राष्ट्रगीतावेळी च्युईंगम चघळताना दिसला. त्याच्यावर सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात टीका होताना दिसत आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाचे राष्ट्रगीत सादर केले जाते. याच प्रथेनुसार भारताचे सर्व खेळाडू एका रांगेत उभे राहून राष्ट्रगीत म्हणत होते. भारताचे सर्व खेळाडू राष्ट्रगीत म्हणत होते. पण त्याचवेळी परवेज रसूल मात्र च्युईंगम चघळत असताना दिसला. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला. या व्हिडिओवर लोकांनी टीकेचा भडिमार केला आहे.
राष्ट्रगीतापेक्षा च्युईंगम चघळणे रसूलसाठी महत्वाचे असल्याची उपरोधिक टीका सोशल मीडियावर होत आहे. रसूल भारताची जर्सी घालू शकतो पण राष्ट्रगीत म्हणू शकत नाही. बीसीसीआय, विराट कोहली हे त्याला सर्वोच्च न्यायालयाची नियमावली समजवून सांगतील अशी आशा करूयात, अशी अपेक्षा काहींनी व्यक्त केली आहे.
काश्मीरमधील बिजबेहाडा येथे राहणारा रसूल काश्मीर खोऱ्यातील पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अष्टपैलू म्हणून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजीबरोबर मधल्याफळीत फलंदाजी करतो. २७ वर्षांचा रसूलने जून २०१४ मध्ये बांगलादेशविरूद्धच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यातून पदार्पण केले होते. आपल्या एकमेव एकदिवसीय सामन्यात त्याने दहा षटकांत ६० धावा देऊन दोन विकेट पटकावल्या होत्या. इंग्लंडविरूद्धच्या एकदिवसीय सराव सामन्यातही त्याला संधी देण्यात आली होती. या सामन्यात त्याने ३८ धावा देऊन तीन गडी टिपले होते. आयपीएलमध्ये तो पुणे वॉरियर्स, सनरायजर्स हैदराबाद आणि रॉलय चॅलेंजर्स बेंगळुरू संघाकडून खेळतो.