‘नोट ड्युप्लिकेट है, चेक करके देता हु’

‘आपके हाथ मे एक नोट ड्युप्लिकेट है’ असे सांगत एका महिलेचे साडे चार हजार रुपये लंपास करण्यात आले. हा प्रकार सोमवारी दुपारी रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या (आरबीआय) विलेपार्ले शाखेत घडल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानुसार जुहू पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

चंद्रभागा उगाडे असे तक्रारदार महिलेचे नाव असून, त्या घाटकोपर परिसरात राहतात. अंधेरीच्या कूपर रुग्णालयात त्या आया म्हणून काम करतात. त्यांचे प्रॉपर्टी डीलर असलेले पती देवराम उगाडे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चंद्रभागा या बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. दुपारची वेळ असल्याने त्या वेळी बँकेत फारशी गर्दी नव्हती. त्यांनी बँकेतून २४ हजार रुपये काढले आणि काउंटरवरून निघणार इतक्यात त्यांच्या मागे रांगेत उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवले. तसेच आजकल नया नोट ड्युप्लिकेट आता है, लाओ मै चेक करके देता हु, असे बोलून त्यांच्या हातातून नोटा खेचून मोजायला सुरुवात केली. तेव्हा काउंटरवरून मी आत्ताच नोटा मोजून घेतल्याचे सांगत चंद्रभागा यांनी त्याच्याकडून पैसे पुन्हा ताब्यात घेतले. मात्र तोपर्यंत त्यातील साडे चार हजार रुपये लंपास करत आरोपी पसार झाला होता. ही बाब चंद्रभागा यांनी बँक शाखा व्यवस्थापकाच्या कानावर घातली. तसेच सीसीटीव्ही तपासण्याची विनंती केली. मात्र मला सीसीटीव्ही फूटेज काढता येत नाही, असे उत्तर त्यांना बँकेतून मिळाले. अखेर चंद्रभागा यांनी जुहू पोलीस ठाणे गाठले. जिथे गावडे नावाच्या महिला पोलिसाला त्यांनी हा प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी एका साध्या वेषातील पोलिसाला चंद्रभागा यांच्यासोबत पाठवले, तेव्हाही तेच उत्तर चंद्रभागा यांना देण्यात आले. मात्र त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. अखेर मंगळवारी उगाडे यांनी जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांची भेट घेतली आणि या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. ‘‘बँकेतील सीसीटीव्हीमार्फत संबंधित आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे,’’ असे घोसाळकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *