गायक अनू मलिकच्या आचाऱ्याला अटक

नशेचे व्यसन लागलेल्या २२ वर्षीय तरुणाने एका सायकलची चोरी केली. हा प्रकार वर्सोवा परिसरात दोन दिवसांपूर्वी घडला असून, अटक करण्यात आलेला तरुण प्रसिद्ध गायक अनू मलिक यांचा आचारी असल्याचे समजते. शोभाराम सोलंकी असे अटक करण्यात आलेल्या या तरुणाचे नाव आहे. मलिक यांच्या घरी जेवण बनविण्याचे तसेच अन्य लहान-मोठ्या कामांत मदत करण्याचे काम तो करायचा.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलंकी याने मलिक यांच्याआधी अनेक मोठ्या सेलीब्रिटींकडे काम केले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे होणाऱ्या पार्ट्यामध्ये दारू तसेच अमलीपदार्थांचे सेवन करण्याचे व्यसन त्याला लागले. मात्र अमलीपदार्थ विकत घेण्याइतके पैसे त्याच्याकडे नसायचे. त्या वेळी त्याच्या एका मित्राने त्याला ‘पैसे नसतील तर सोसायटीतील महागड्या सायकल चोरू आणि त्या विकू,’ असे सांगितले. तेव्हा त्याने सायकलची चोरी करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने वर्सोव्याच्या उच्चभ्रू सोसायट्यांमधील जवळपास ११ सायकली लंपास केल्या. यातील प्रत्येक सायकलची किंमत २० हजार रुपयांहून अधिक असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तक्रारी वाढल्यानंतर पोलिसांनी या सोसायटीतील सीसीटीव्ही फूटेज पडताळून पाहिले. यात सोलंकीबाबत त्यांना माहिती मिळाली; त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. या प्रकरणी पोलीस त्याच्या फरार साथीदारांचा शोध घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *