पत्रकार ही या पृथ्वीतलावरील सर्वांत बेईमान जमात असल्याची टीका अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. माध्यमांविरोधात आपले युद्ध सुरूच असल्याचे सांगत ट्रम्प यांनी, त्यांच्या शपथग्रहण सोहळ्यावेळी नागरिकांची संख्या कमी असल्याचे सांगणा-या माध्यमांवर कारवाईचा इशारा दिला.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, या कार्यक्रमावेळी किमान १५ लाख नागरिक उपस्थित होते पण, माध्यमांनी उपस्थिती फारच कमी असल्याचे वार्तांकन केले. मला भाषण करताना समोर लाखो लोक दिसत होते. तरीही माध्यमांनी फारसे नागरिक आले नाहीत, असे चित्र उभे केले. हा खोटेपणा आहे. या खोटेपणाची त्यांना किंमत मोजावी लागेल. अमेरिकेची गुप्तचर संस्था सीआयएच्या मुख्यालयामधील एका कार्यक्रमादरम्यान ट्रम्प हे बोलत होते.
याच पत्रकारांनी मी सीआयएच्या विरोधात असल्याचे चित्र उभे केले होते. मात्र माझा पहिलाच कार्यक्रम मी येथे घेण्याचे कारण हे याच्या नेमके उलट आहे. आणि याची त्यांनाही जाणीव आहे, असे ट्रम्प म्हणाले.