मुंबई आणि ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी शिवसेना पक्षप्रमूख उद्धव ठाकरे यांनी अनेक घोषणा केल्या. यावेळी मुंबईप्रमाणेच ठाणेकरांनाही उद्धव ठाकरेंनी मालमत्ता करात सूट देण्याचे आश्वासन दिले. ठाणेकरांसाठी स्वतंत्र धरण, सेंट्रल पार्क आणि खारेगावमध्ये सिंगापूरच्या धर्तीवर चौपाटीचा विकास अशा घोषणा उद्धव ठाकरे यांनी केल्या आहेत. तर दुसरीकडे युतीविषयी मात्र तिढा कायम आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपामध्ये मुंबई महानगरपालिकेतील युतीबाबत सुरू असलेल्या बैठका आणि चर्चेच्या गु-हाळांच्या पार्श्वभूमीवर आजच्या पत्रकार परिषदेत युतीबाबत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उद्धव ठाकरे यांनी युतीच्या प्रश्नावर सावध पवित्रा घेत या प्रश्नाला बगल दिली. युतीविषयी चर्चा सुरु असून अद्याप भाजपाकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. प्रस्ताव आल्यास दोन्ही पक्षांचे पक्षश्रेष्ठी चर्चा करतील असे ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना-भाजपाची युती अखेर तुटली?
मात्र युतीच्या निर्णयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढाकार घेणार नसल्याचे वृत्त आहे. वारंवार चर्चा फिस्कटत असल्याने यापुढे चर्चेत पुढाकार न घेण्याची भूमिका भाजपाने घेतली आहे. भाजपाच्या निवडणूक समितीची आज मुंबईत बैठक होणार असून त्यात राज्यातील विविध निवडणुकांबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते.
दरम्यान, मुंबईप्रमाणेच ५०० फुटापर्यंतच्या घरात राहणा-या ठाणेकरांना मालमत्ता कर माफ केले जाईल. तर ७०० फुटापर्यंतच्या घरात राहणा-यांना मालमत्ता करात सूट दिली जाईल असे ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्याचबरोबर सत्ता आल्यास मुंबईतील गणवेशधारी शाळकरी विद्यार्थ्यांना बेस्टमधून मोफत प्रवास करण्याची सवलत देण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली. ठाण्यातील पाणीटंचाईवर मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर आता शिवसेनेची सत्ता आल्यास ठाण्यासाठी स्वतंत्र धरण बांधले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कोलशेतमध्ये ३० एकरच्या जागेवर सेंट्रल पार्क तयार केला जाणार असून या पार्कमध्ये थीम पार्क, लहान मुलांसाठी प्ले झोन, थीम पार्क, तलाव असेल असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत त्यांनी सेंट्रल पार्कचे प्रस्ताविक रेखाचित्रही दाखवले. शिवाय घोडबंदरला मोठे स्टेडियम बांधण्यात येईल. खारेगावमध्ये सिंगापूरच्या धर्तीवर अत्याधुनिक आंतराष्ट्रीय पातळीवर चौपाटीचा विकास केला जाईल. तसेच सत्तेत आल्यानंतर कल्याण-डोंबिवली आणि ठाणे शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच मीरा भाईंदर आणि ठाण्यात जलवाहतुकीला प्राधान्य देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. उद्धव ठाकरे यांनी घोषणांचा पाऊस पाडला असला तरी युतीविषयी मात्र कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही.