सेल्फी व ऑनलाईन हजेरी पद्धत बंद करण्याची शिक्षक संघटनांची मागणी

राज्य सरकारने शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी काढून व ऑनलाईन हजेरी अपलोड करण्यासाठी शासन निर्णयानुसार बंधनकारक केल्याच्या निषेधार्थ शहापूर तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येत या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र शाळेवर उशिरा जाणारे, दांडया मारणा-या शिक्षकांना या निर्णयामुळे चाप बसणार असल्याने पालकवर्गाने मात्र या निर्णयाचे स्वागत केले आहे.

सरकारी शाळांवर अध्यापनाचे काम करीत असताना तेथील शिक्षकांना शालेय पोषण आहार, दत्तक पालक योजना, आधारकार्ड लिंक करणे, शाळा विकास आराखडा तयार करणे, निवडणुका, शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, जनगणना यासारखी अनेक सरकारी कामे अध्यापनाच्या व्यतिरिक्त करावी लागत असतात. त्यामुळे शाळेच्या कामावरही परिणाम होतो.

यातच राज्य सरकारने शाळेवर अध्यापनासाठी जाणा-या शिक्षकांना विद्यार्थ्यांसोबत सेल्फी व ऑनलाइन हजेरीचे बंधन घालण्यात आले आहे. मात्र शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही इंटरनेटची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. काही ठिकाणी मोबाईलला रेंज नसते, त्यामुळे सेल्फीचा विषय दूर असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची, हा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

शनिवारी सकाळी शहापूर पंचायत समितीमध्ये सर्व शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधी प्रमोद पाटोळे, अनिल वरकुटे, भगवान फर्ड, भारत मडके, सुधीर भोईर, दामोदर पडवळ, दशरथ विशे, काशिनाथ भोईर, प्रदीप विशे, दामोदर पालवे, हरी गावांडा, नवनाथ पवार यांनी शहापूर गट शिक्षणाधिकारी यांची भेट घेत या निर्णयाविरोधात पत्रव्यवहार करीत विरोध दर्शवला.

सरकारच्या या ‘सेल्फी’ च्या निर्णयाला संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शिक्षक संघटनाचा विरोध असून सर्व शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध म्हणून काळ्या फिती लावून मुलांना शिकविण्याचे काम केले. परंतु भविष्यात उग्र आंदोलन देखील छेडले जाऊ शकते, याची शासनाने नोंद घ्यावी असे स्वाभिमान शिक्षक संघटनचे पदाधिकारी काशिनाथ भोईर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *