२४ जानेवारीला मुंबईत धनगर समाजाचा मोर्चा

दोन वर्षापूर्वी राज्यात सत्तेत येताना भाजपाचे नेते आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता त्या आश्वासनाचे नेमके काय झाले, याचा जाब विचारण्यासाठी राज्यातील लाखो धनगर समाजातील बांधवांकडून २४ जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या मोर्च्यात धनगर समाजातील विविध राजकीय संघटनांसोबतच सामाजिक संस्था, संघटनांचे हजारो प्रतिनिधी सहभागी होणार असल्याची माहिती धनगर समाजातील ज्येष्ठ नेते गणेश बुधे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आश्वासन देऊन त्यासाठीची योग्य अमंलबजावणी केली नाही, यामुळे समाजाची घोर फसवणूक झाली असून यामुळे राज्यभरात सरकारविरोधात एक संतापाचे वातावरण धनगर समाजात निर्माण झाले असल्याची माहितीही यावेळी बुधे यांनी दिली.

सरकारने आमच्या आता आरक्षणासाठी ठाम भूमिका स्पष्ट करावी, यासाठीच हा मोर्चा काढला जाणार असून या निमित्ताने राज्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि महापालिका आणि विधान परिषदेच्या पदवीधर, शिक्षक मतदार संघात सरकारमध्ये असलेल्या प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांना आमच्या धनगर आरक्षणाचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जाणार असल्याचे यावेळी बुधे यांनी सांगितले.

तर सरकारने धनगर आरक्षणाच्या संदर्भात लवकरात लवकर अंमलबजावणी केली नाही तर आता व येणा-या काळातील सर्व निवडणुकामध्ये आम्ही सरकारच्या विरोधात भूमिका घेऊ यासाठीचा विचारही या मोर्च्याच्या निमित्ताने केला जाणार असल्याचे बुधे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *