अॅमेझॉन कंपनी भारताच्या महनीय व्यक्ती आणि राष्ट्रीय प्रतिकांचा एकीकडे खुलेआम अपमान करत सुटली असतानाच आता इंग्लंडमध्येही अॅमेझॉनच्या कर्मचा-याने केलेल्या एका धक्कादायक प्रकाराने संतापाची लाट उसळली आहे.
एका ज्यू महिलेने तिच्या भाचीसाठी मागवलेल्या खेळण्यांमध्ये या कर्मचा-याने ‘अंकल अॅडॉल्फकडून शुभेच्छा’ असे लिहिलेली चिठ्ठी टाकली. ही चिठ्ठी पाहून या महिलेला मोठा धक्का बसला. हा प्रकार त्यांनी पोलिसांत नेल्यानंतर अॅमेझॉनने या कर्मचा-याला कामावरून काढून टाकत आपली सुटका करून घेतली आहे.
सदर महिला ही इंग्लंडमध्ये सामाजिक काम करत असून तिने तिच्या भाचीसाठी अॅमेझॉनच्या वेबसाईटवरून खेळणी मागवली होती. या खेळण्यांचे पार्सल तिला २२ डिसेंबर रोजी मिळाले, मात्र या पार्सलमध्ये अॅमेझॉनच्या पॅकिंगच्या आत एक चिठ्ठी त्यांना सापडली. या चिठ्ठीवर ‘अंकल अॅडॉल्फकडून शुभेच्छा’ असे लिहिले होते. चिठ्ठी खेळण्यांच्या पॅकिंगमध्ये नसल्याने ती अॅमेझॉनच्या कर्मचा-याने पार्सल पॅक करताना टाकल्याचा त्यांना संशय आला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले.
पोलिसांनी हे पार्सल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले. यानंतर अॅमेझॉनला याबाबत समजल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचा-याचा शोध घेऊन त्याला कामावरून काढून टाकले. या महिलेची वैयक्तिकरित्या माफी मागितल्याचेही अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
अॅडॉल्फ हिटलर याने लाखो ज्यू लोकांच्या अमानुषपणे हत्या केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या नावाची अजूनही ज्यू लोकांमध्ये धास्ती आहे. त्यामुळेच या महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे या महिलेच्या निकटवर्तीयांनी सांगितले.