जगात प्राणिसंग्रहालयात पहिल्यांदा जन्मलेल्या मादी गोरिलाचा १७ जानेवारी रोजी रात्री झोपेत मृत्यू झाला. कोलो असे तिचे नाव होते. कोलोचा महिनाभरापूर्वी ६० वा वाढदिवस झाला. ही माहिती अमेरिकेतील ओहिओ राज्यातील कोलंबस झू अँड अॅक्वॅरियमने दिली.
२२ डिसेंबर १९५६ रोजी कोलोचा जन्म झाला. ती तीन मुलांची आई, १६ नातवंडांची आजी, १२ पिल्लांची पणजी आणि तीन पिल्लांची खापर पणजी बनली होती. याच प्राणिसंग्रहालयात कोलोचे पालनपोषण झाले. तिला कधीही येथून जावे लागले नाही. प्राणिसंग्रहालयात राहिलेल्या किंवा ठेवल्या गेलेल्या गोरिलांच्या अपेक्षित आयुष्यापेक्षा कोलोला दोन दशकांचे आयुष्य जास्त लाभले, असे शिन्हुआ वृत्त संस्थने म्हटले. तीन डिसेंबर रोजी कोलोवर शस्त्रक्रिया करून घातक अशी गाठ काढण्यात आली होती. अर्थात ही गाठ कर्करोगाची होती का हे समजले नाही. ‘‘मी ज्या जनावरांची काळजी घेतली त्यात कोलो अतिशय शांत होती. तिची काळजी घेणे हा माझ्या आयुष्यातील महत्वाचा भाग होता’’, असे प्राणिसंग्रहालयातील कोलोची देखभाल करणारे आॅड्रा यांनी सांगितले.