तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी तामिळनाडूच्या राजकारणात उडी घेतली आहे. २४ फेब्रुवारी रोजी जयललिता यांच्या जन्मदिनी त्या आपला पुढील राजकीय प्रवास सर्वापुढे मांडणार असल्याचे दीपा यांनी जाहीर केले.
अण्णा द्रमुकमध्ये आपल्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी दीपा यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. आपण कोणता नवीन राजकीय पक्ष काढणार किंवा कोणत्या पक्षात प्रवेश करणार, हे पत्ते त्यांनी अद्याप उघडलेले नाहीत. जयललिता यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण राजकारणात उतरल्याचे दीपा यांनी सांगितले.
जयललिता यांच्या वारसदार म्हणून दीपा यांच्याकडेही पाहिले जाते. त्यांनी राजकारणात प्रवेश करून जयललिता यांचा वारसा चालवावा, अशी मागणी द्रमुकच्या कार्यकर्त्यांची होती. मात्र जयललिता यांच्याशी जवळीक असलेल्या शशिकला यांना त्यांचा विरोध होता. त्यामुळे द्रमुकमध्ये दुफळी आहे. दीपा या जयललिता यांच्या भावाची मुलगी आहेत.
जनसेवेसाठीच मी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. २४ फेब्रुवारी रोजी राजकीय निर्णय जाहीर करण्याआधी आपण राज्यभर दौरा करून समर्थकांची मते जाणून घेणार आहोत. जयललिता यांचा २४ फेब्रुवारी रोजी जन्मदिवस असल्याने याच दिवसाची निवड आपली राजकीय भूमिका जाहीर करण्यासाठी आपण केली.