मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरल्याने तिन्ही मार्गांवरील लोकल गाड्या उशिराने धावत असतानाच सकाळी ७.३० च्या सुमारास दादर रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा खोळंबा झाला. दादर ते छत्रपती शिवाजी टर्मिनसदरम्यान धीम्या मार्गावरील सर्व गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्याने कुर्ला ते दादर या १५ मिनिटांच्या प्रवासाला तब्बल एक तास लागत होता.
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात फलाट क्रमांक तीनवर ओव्हरहेड वायर तुटली होती. रेल्वे कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेऊन दोन तासांत हा मार्ग पुन्हा खुला करण्यात यश मिळवले आहे. मात्र या दरम्यान प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. ऐन गर्दीच्यावेळी धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात आल्याने जलद मार्गावर मोठी कोंडी झाली. कल्याण, कर्जत, कसाऱ्याहून मुंबईत वेळेत दाखल झालेले हजारो प्रवासी कुर्ला ते दादरदरम्यान रखडले. या स्थानकांदरम्यान लोकल गाड्यांची मोठी रांग लागली होती. धीमा मार्ग ९.४० च्या सुमारास खुला करण्यात आला असला तरी वाहतूक पूर्वपदावर येण्यास आणखी काही वेळ लागणार आहे.

