अन्य मुलींसोबतही केले अन्सारीने अश्लील चाळे

साकीनाक्यात बारा वर्षीय मुलीच्या विनयभंग प्रकरणी सादिक अन्सारी (३२) या नराधमाला मंगळवारी अटक करण्यात आली. त्याने या परिसरात अन्य काही मुलींसोबतही व्हाइटनरची नशा देत अश्लील चाळे केल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून त्यानुसार पोलीस चौकशी करत आहेत.

अन्सारी हा त्याच्या बेकरीत खाण्यापिण्याच्या वस्तू घेण्यासाठी येणाऱ्या लहान मुलींशी मैत्री करायचा. त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन बेकरीच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत नेऊन त्यांच्यासोबत

अश्लील चाळे करायचा. त्यांना व्हाइटनरची नशा देत तो असा प्रकार करायचा, असे येथील स्थानिकांचे म्हणणे आहे. ज्या विद्यार्थिनीने पालकांना अन्सारीबद्दल सांगितले होते, ती काही अन्य मुलींचीदेखील नावे घेत आहे. त्यांच्यावरदेखील अशाच प्रकारे अन्सारीने अत्याचार केल्याचे तिचे म्हणणे आहे.

‘आम्ही अन्सारीवर पॉस्कोअंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पीडित मुलीने तिच्या आईला जी काही माहिती दिली त्यानुसार आम्ही अन्सारीविरोधात वैद्यकीय पुरावेदेखील मिळवले. त्यामुळे अन्य मुलींसोबतही जर असा काही प्रकार त्याने केला असेल तर संबंधित मुलीच्या पालकांनी पुढे येऊन याबाबत आमच्याकडे तक्रार करावी. जेणेकरून आम्हाला अन्सारीविरोधात कारवाई करता येईल,’ असे साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

मात्र अद्याप आमच्याकडे तशी कोणतीही तक्रार आलेली नाही, त्याचबरोबर आम्ही अन्सारीकडेदेखील याबाबत विचारणा करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले. या प्रकारामुळे साकीनाका परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *