परवान्याची मुदत संपलेले शस्त्र वापरणे व ते जवळ बाळगणे अभिनेता सलमान खानला महागात पडणार आहे. जोधपूर न्यायालयात १८ जानेवारी रोजी शस्त्रास्त्र प्रकरणात जोधपूर न्यायालयात सलमानचा फैसला होणार आहे. या प्रकरणात तो दोषी ठरल्यास त्याला सात वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो.
न्यायालयाने सोमवारी त्याच्याविरोधात निकालाची तारीख निश्चित केली. दोन्ही बाजूंकडील अंतिम युक्तिवाद संपल्यानंतर महानगर न्यायदंडाधिका-यांनी ही तारीख जाहीर केली. महानगर न्यायदंडाधिकारी दलपत सिंग राजपूत यांनी निकालाच्या दिवशी सलमानने कोर्टात हजर राहावे, असे आदेश यावेळी दिले.
गेल्या वर्षी ९ डिसेंबरपासून या प्रकरणी अंतिम सुनावणीला सुरुवात झाली होती. शस्त्रास्त्र कायद्याखाली ऑक्टोबर १९९८ मध्ये जोधपूर पोलिसांनी सलमानविरोधात गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा वन विभागाने नोंदवला होता.
