अल बद्र दहशतवादी संघटनेचा दहशतवादी मारला गेला आहे. लष्कराचे जवान आणि पोलीस यांच्यासोबतच्या चकमकीत मुझफ्फर अहमदला कंठस्नान घालण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमधील बडगाममधील माछू भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये मुझफ्फर अहमदला ठार करण्यात लष्कराच्या जवानांना यश आले.
शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत मुझफ्फर अहमद मारला गेला. मुझफ्फर अहमद आधी लष्कर ए तोयबाशी संबंधित होता. त्यानंतर तो अल बद्र या दहशतवादी संघटनेत दाखल झाला. अल बद्र ही जम्मू काश्मीरमधील दहशतवादी संघटना आहे. जसनिल रिहाल हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. पाकिस्तानची गुप्तचर संघटना असलेल्या आयएसआयने जून १९९८ मध्ये अल बद्रची स्थापना केली होती.
अल बद्र ही दहशतवादी संघटना पूर्वी हिझबुल मुजाहिद्दीनसाठी काम करत होती. मात्र त्यानंतर आयएसआयने या संघटनेसा स्वतंत्रपणे काम करण्यास सांगितले. त्यानंतर अल बद्र स्वतंत्रपणे दहशतवादी कारवाया करु लागली.