तुमच्याकडे 500 आणि हजार रुपयांच्या 2005 पूर्वीच्या नोटा असतील, तर त्या येत्या आठ दिवसात म्हणजेच 30 जूनपर्यंत बदलून घ्या. कारण 2005 पूर्वीच्या नोटा चलनातून वगळण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे.
सध्या पाचशे आणि हजार रुपयांच्या 144 कोटी 66 लाख इतक्या नोटा बाजारात आहेत. त्यांची किंमत सुमारे 5 लाख 2 हजार 855 कोटी इतकी आहे. या सर्व नोटा चलनातून वगळण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. काळा पैसा आणि नकली नोटांना प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळं या जुन्या नोटा आता 30 जून 2015 पर्यंत बदलणं गरजेचं आहे.
या नोटा बदलण्यासाठी पूर्वी 31 डिसेंबर 2014 पर्यंतची मुदत होती. मात्र त्यावेळी ती वाढवून 30 जून 2015 करण्यात आली.
2005 पूर्वीच्या नोटा कशा ओळखाल?
2005 पूर्वीच्या 500 आणि हजाराच्या नोटा ओळखण्याचा सोपा मार्ग आहे. ज्या नोटेवर वर्ष लिहिलेलं नाही, ती नोट 2005 पूर्वीची आहे. ती थेट बँकेतून बदलून घ्या. 2005 नंतरच्या सर्व नोटांवर मुद्रण वर्ष छापलेलं आहे.
कुठल्याही नोटेच्या खालच्या बाजूस छपाईचे वर्ष आहे. त्यामुळं वर्षाचा उल्लेख नसलेल्या सर्व नोटा बदलून घेण्याचं आवाहन आरबीआयनं केलं आहे.
2005 पूर्वीच्या नोटा तुमच्या जवळच्या बँकेत (तुमचं खातं असलं तरी, अथवा नसलं तरी) बदलून मिळतील.

