दोन हजारच्या नोटांवरुन महात्मा गांधी गायब

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही दिवसांमध्येच दोन हजार रुपयांच्या नव्या नोटा लोकांच्या हाती पडल्या. सुरुवातीला नव्या नोटा अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध होत्या. मात्र आता देशभरातील चलनकल्लोळ कमी होताना दिसत आहे. देशभरातील मुद्रणालयांनी वेगाने नव्या नोटांची छपाई केल्याने देशातील चलन पुरवठा सुरळीत होताना दिसतो आहे. मात्र आता या वेगवान छपाईमुळे नव्याच समस्या निर्माण झाल्या आहेत. कारण आता गांधीजींची प्रतिमा नसलेल्या नोटा लोकांना मिळत असल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे.

मध्यप्रदेशातील श्योपूरमधील काही शेतकऱ्यांना महात्मा गांधींची प्रतिमा नसलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा मिळाल्या आहेत. या नोटा हातात पडल्यावर शेतकऱ्यांना एकच धक्का बसला. राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिमाच नसलेल्या नोटा पाहून शेतकऱ्यांना आश्चर्य वाटले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमधून शेतकऱ्यांना या सदोष नोटा मिळाल्या होत्या. शेतकऱ्यांनी या नोटांमधील चूक बँक कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावर बँकेकडून या नोटा परत घेण्यात आल्या.

महात्मा गांधींची प्रतिमा नसलेल्या नोटा सापडल्याची माहिती आसपासच्या भागात पसरल्यावर प्रत्येकजण स्वत:कडे असणाऱ्या दोन हजार रुपयांच्या नोटा तपासून पाहू लागला. या नोटांवरील महात्मा गांधींची प्रतिमा नेमकी कशी गायब झाली, याची चर्चा सध्या मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये सुरू आहे. गांधींची प्रतिमा नसलेल्या नोटा बनावट आहेत का, असा प्रश्नदेखील लोकांना पडला आहे.

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये हा प्रकार घडला आहे. काडूखेडली गावातील गुरमीत सिंह यांनी मंगळवारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ८ हजार रुपये काढले होते. बँकेच्या काऊंटरवरुन गुरमीत यांना २ हजार रुपयांच्या ४ नोटा मिळाल्या. या नोटा तपासून पाहताना गुरमीत यांना धक्का बसला. यानंतर गुरमीत यांनी त्यांच्या भावाला २ हजारांच्या नोटा दाखवल्या. गुरमीत यांच्याकडे असणाऱ्या नोटा पाहून त्यांच्या भावालादेखील धक्का बसला. या नोटांवर महात्मा गांधींची प्रतिमाच नसल्याने गुरमीत आणि त्यांच्या भावाचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.

यानंतर गुरमीत आणि त्यांच्या भावाने बँकेत जाऊन संपूर्ण प्रकार शाखा व्यवस्थापकांना सांगितला. शाखा व्यवस्थापकांनी सुरुवातीला नोटा परत घेण्यास नकार दिला. मात्र अखेर व्यवस्थापकांनी या नोटा परत घेतल्या. गुरमीत सिंह यांच्यासोबतच बाबडीतील लक्ष्मण सिंह मीणा यांच्यासोबतदेखील असाच प्रकार घडला. मीणा यांना मिळालेल्या २ हजारांच्या ३ नोटांवर महात्मा गांधींची प्रतिमाच नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *