इंडोनेशियात नौका दुर्घटना २३ ठार, १७ बेपत्ता

जकार्ता नजीक एक प्रवासी बोट पेटल्याने किमान २३ ठार व इतर १७ जण बेपत्ता झाले आहेत,  असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवासी बोटीत दोनशे प्रवासी होते व ती राजधानीपासून ५० कि.मी दूर असलेल्या तिडुंग येथे जात होती. ते एक पर्यटन स्थळ आहे, ही बोट प्रवास करीत असताना अचानक तिला आग लागली, असे राष्ट्रीय आपत्ती संस्थेचे प्रवक्ते सुतोपो पूवरे नुग्राहो यांनी सांगितले.

सुरूवातीला या दुर्घटनेत दोन जण ठार झाल्याचे सांगण्यात आले होते, तर १७ जण बेपत्ता होते पण नंतर २३ जण मरण पावल्याचे स्पष्ट झाले. बोटीत लागलेल्या आगीचे कारण समजू शकले नाही. अधिकारी अजूनही प्रवाशांचा शोध घेत आहेत असे वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे, बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी मदत पथक पाठवण्यात आले आहे.

इंडोनेशियात एकूण १७ हजार लहानमोठी बेटे असून ती वाहतुकीसाठी बोटींवर अवलंबून आहेत. यात सुरक्षिततेचा अभाव असून अपघात नित्याचेच झाले आहेत.

गेल्या नोव्हेंबर महिन्यात एक स्पीड बोट उलटून ५४ जण ठार झाले होते, त्या बोटीत एकूण ९८ प्रवासी होते. ते सर्व मलेशियातून बाटमला जाणारे इंडोनेशियाचे स्थलांतरित कर्मचारी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *