तुझ्यावर करणी करण्यात आली असून ती उतरविण्यासाठी माझ्या अंगात शक्ती आहे, अशी बतावणी करीत एका भोंदूबाबाने महिलेला तब्बल पाच लाख ९७ हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार ठाण्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, फसवणूक करणारा भोंदूबाबा पोलीस असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या ‘पोलीसबाबा’च्या प्रतापामुळे ठाणे पोलीसही चक्रावले असून या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ात त्याच्यावर कोणत्याही क्षणी अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.
अरब देशातील शारजाहमध्ये पीडित ३१ वर्षीय महिला राहत असून तिची आई आणि बहीण ठाण्यातील खारकर आळीमधील नवीन पोलीस वसाहतीत राहते. जानेवारी २०१६ मध्ये ती ठाण्यात आईकडे आली होती. त्या वेळेस एका मैत्रिणीला भेटण्यासाठी जात असताना तिची भेट मनोहर पाटोळे यांच्याशी झाली. मनोहर हा पोलीस दलात कार्यरत असून तो आणि पीडित महिला पूर्वी एकाच वसाहतीत राहायची. या ओळखीतून तिने घरातील भांडणाबाबत त्याला माहिती दिली. त्याचाच फायदा घेत त्याने तिचा मोबाइल क्रमांक घेतला आणि तिला फोन करून दुसऱ्या दिवशी भेटायला बोलाविले. ती त्याला भेटायला गेली असता, त्याने मित्राच्या घरातून सोने काढले असल्याचे मोबाइलमध्ये फोटो दाखवून अशा प्रकारची कामे करीत असल्याचे तिला सांगितले. त्यानंतर ‘तुझ्यावर सासरच्यांनी खूप वाईट करणी केली आहे. तुझ्या मुलाला संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तुझ्या नवऱ्याला दुसरी मुलगी दाखवित आहेत. पण सध्या तुझा नवरा हो बोलत नाही. मी तुझी करणी उतरवितो, त्यानंतर तो तुझ्याशी चांगला वागेल’ अशा बतावण्या करीत तिच्याकडून पैसे घेण्यास सुरुवात केली. जानेवारी ते एप्रिल या काळात रोख रक्कम, सोन्याचे दागिने असे एकूण ५ लाख ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन त्याने तिची फसवणूक केली. या प्रकरणी तिने दिलेल्या तक्रारीवरून राबोडी पोलीस ठाण्यात मनोहर पाटोळे आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘जीन’ वस्तूला ओळखतो..
भोंदूबाबा मनोहर याने त्याच्याकडे एक जीन असल्याचेही पीडित महिलेला सांगितले होते. हा जीन त्याच्याच सांगण्यावरून काम करतो आणि त्या कामासाठी त्याला पैसे लागतात, असेही त्याने सांगितले होते. त्यामुळे पीडित महिलेच्या आईने डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी वीस हजार रुपये ठेवले होते. तेच पैसे पीडित महिलेने त्याला दिले होते. त्यानंतर त्याने पीडित महिलेच्या आई आणि बहिणीचे दागिने घेऊन उदी आणि मंत्रही दिले होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात त्याने पुन्हा पैशांची मागणी केली असता पीडित महिलेने दुसऱ्या बहिणीचे दागिने विकून ३३ हजार रुपये दिले होते.
करणी उतरविण्यासाठी रेडय़ाची खरेदी..
पीडित महिला शारजाह येथे गेल्यानंतर त्याने तिच्या मोबाइलवरून संपर्क साधला आणि इथे करणी उतरविण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच करणी उतरविण्यासाठी रेडा विकत घेतला असून त्याचे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यामुळे तिने शारजाह येथून पुन्हा पैसे पाठविले. यानंतरही पैशांची मागणी करून त्याने तिच्याकडून पैसे वसूल केले. एके दिवशी त्याने साडेतीन लाखांचे कर्ज झाल्याचे सांगत त्यासाठी पतीकडून पैसे आणण्यास सांगितले. मात्र, तिने नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने भारतात आल्यानंतर या प्रकरणी तक्रार दिली.