लोहमार्ग ओलांडत असताना भरधाव एक्स्प्रेसने धडक दिल्याने एका ३० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला. रेल्वे अंगावरून गेल्याने या युवकाचे शिर धडापासून वेगळे झाले आहे. ही घटना पुण्याजवळील पिंपरी रेल्वे स्थानकानजीक शुक्रवारी सकाळी साडेअकाराच्या सुमारास घडली. मृताची ओळख पटली असून संजय गंगाराम काकडे (वय ३०, नेहरू नगर) असे त्याचे नाव आहे.
सकाळी साडेअकराच्या सुमारास संजय काकडे हा लोहमार्ग ओलांडून जात होता. त्याचवेळी मुंबईहून बंगळूरूला जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसने त्याला धडक दिली. या धडकेत संजयचा जागीच मृत्यू झाला. त्याचे शिर धडापासून वेगळे झाल्याची माहिती हेड कॉन्स्टेबल पाटोळे यांनी दिली आहे.
लोहमार्ग ओलांडत असताना संजयला रेल्वे कशी दिसली नाही, हा आत्महत्येचा प्रकार होता काय ? याचा तपास लोहमार्ग पोलीस करत आहेत.