उस्मानाबादमध्ये दोन बसेसचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर-हैदराबाद मार्गावर झालेल्या या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर वीस जण जखमी झाले आहेत. उस्मानाबादमधील उमरगा येथील येणेगूरजवळ हा अपघात झाला आहे.
सोलापूर-हैदराबाद मार्गावर महाराष्ट्र परिवहन महामंडळ आणि कर्नाटक परिवहन महामंडळाची जोरदार धडक झाली. या दोन्ही बसेस समोरासमोर धडकल्याने दोन्ही बसेसच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बस उमरग्याहून पुण्याला जात असताना, तर कर्नाटक परिवहन महामंडळाची बस बसवहून कल्याणला जात असताना हा अपघात झाला.
सकाळी आठच्या वेळी झालेल्या या अपघातानंतर मुंबई-हैदराबाद महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती. जखमी झालेल्या २० जणांपैकी ८ प्रवाशांची प्रकृती अतिशय गंभीर आहे.