१३ लाखांच्या नव्या नोटा जप्त; दोघे अटकेत

जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा बदलून देण्यासाठी आलेल्या नामांकित बँकेच्या बिझनेस मॅनेजरसह एकाला कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापाळा रचून कल्याण-शीळ रस्त्यावरील एका हॉटेल परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून १३ लाख ४१ हजार ८२० रुपयांच्या नोटा हस्तगत केल्या आहेत.

सुंदरम सुब्रमण्यम (३१) आणि चेतन पाटील (३७ ) अशी त्यांची नावे आहेत. सुंदरम हा बिझनेस मॅनेजर तर चेतन हा व्यापारी आहे.

जुन्या नोटांच्या बदल्यात नवीन नोटा देण्यासाठी कोपरखैरणे येथून डोंबिवलीत रविवारी रात्री दोघे येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे अन्वेषणच्या शैलेंद्र नगरकर आणि त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार कल्याण-शीळ रस्त्यावरील बंटी हॉटेल परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे २ हजाराच्या ६२२, ५०० रुपयांच्या तीन, १०० च्या ७००, ५० च्या १०० तसेच ५० व २० च्या नोटाही सापडल्या आहेत.

अलिकडेच खडकपाडा पोलिसांनी २१ लाख २२ हजारांच्या तर बाजारपेठ पोलिसांनी २३ लाखांच्या नव्या नोटा जप्त केल्या होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *