शहरात गेल्या चार दिवसांत चोरट्यांनी सलग दोन दिवस 11 ठिकाणी चोऱ्या करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले होते. त्यानंतर पोलिसांनी सुरू केलेल्या झडती मोहिमेत शिवाजी चौकातील जयमल्हार हॉटेलमध्ये मध्य प्रदेश येथील एका संशयित आरोपीला गावठी पिस्तूल, गावठी रिव्हॉल्वर व 14 जिवंत काडतुसांसह अटक केली. तर बीड येथील गुन्हा अन्वेषण पथकाने पाटोदा बसस्थानकात एकास तलवारीसह अटक केली आहे.
शुक्रवारी (ता.19) आरोपींना येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
शहरातील शिवाजी चौक ते पोलिस ठाणे या रस्त्यावरील आठ दुकाने चोरट्यांनी मंगळवारी (ता. 16) एकाच रात्रीत फोडली. त्यानंतर बुधवारी (ता.17) रात्री पुन्हा तीन दुकाने फोडली. मुख्य रस्त्यावरील सलग दुकानांतील चोऱ्यांमुळे सुस्तावलेली पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली. या चोऱ्यांच्या तपासासाठी बीड येथील गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकही पाटोदा पोलिसांच्या मदतीला देण्यात आले. चोऱ्यांचा तपास करताना पाटोदा पोलिसांना गुरुवारी (ता.18) शिवाजी चौकातील जयमल्हार हॉटेलमध्ये जगदीश रालीया बोरडे (रा. दुधवाडा ता. नेवाले, मध्य प्रदेश) हा संशयित सापडला.
पाटोदा पोलिसांनी त्याच्याबरोबर सय्यद जमीर सय्यद शहा, माऊलीनगर पाटोदा व धनंजय सुदाम अडागळे (रा. पाटोदा) यांनाही ताब्यात घेतले. जगदीश बोरडे याच्याकडून एक गावठी पिस्तूल, एक गावठी रिव्हॉल्वर व चौदा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तर त्याच दिवशी पाटोदा बसस्थानकावर गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बापू मखमल टाक (रा. चिखली, ता. पाटोदा) यास तलवारीसह अटक केली. शुक्रवारी (ता.19) सदर आरोपींना पाटोदा न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
