कर्नाटकमधील मंत्र्याला नोटा बदलून देणारे आरबीआयचे कर्मचारी रडारवर

कर्नाटक सरकारमधील एका ज्येष्ठ मंत्र्याला चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा बदलून देणारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) चार कर्मचारी सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत. यामध्ये आरबीआयच्या व्यवस्थापकीय दर्जाच्या अधिका-याचाही समावेश आहे. ‘आम्हाला तक्रार मिळाली असून यामध्ये आरबीयाच्या कर्मचा-याच्या नावाचा उल्लेख असल्याने सत्यता तपासली जात आहे. जर यामध्ये सत्यता आढळली, तर आम्ही कारवाई करु’, असं सीबीआयने सांगितलं आहे.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणारी एक ऑनलाइन याचिकाही सध्या सोशल मीडियावर फिरु लागली आहे. या याचिकेमध्ये एका आयपीएस अधिका-याचा नातेवाईक असणा-या आरबीआय अधिका-याने काळा पैसा करण्यासाठी मध्यस्थी केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
शनिवारी नोटाबदली प्रकरणी आरबीआयच्या दोन कर्मचा-यांना अटक करण्यात आली होती. सीबीआयने बंगळुरुमधून अटकेची कारवाई केली आहे. तब्बल 1 कोटी 99 लाख रुपयांची नोटाबदली या कर्मचा-यांनी करुन दिली होती. नोटाबदली करुन देताना 2000 आणि 100 च्या नोटा या कर्मचा-यांनी दिल्या होत्या. वरिष्ठ विशेष सहाय्यक सदानंदा नाईक आणि रोख विभागातील विशेष सहाय्यक ए के केविन अशी या अटक करण्यात आलेल्या कर्मचा-यांची नावे आहेत. दोन्ही आरोपी कर्मचा-यांनी चार दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्यात आले आहे.
नोटाबदली प्रकरणात आरबीआयच्या कर्मचा-यांना अटक होण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी 13 डिसेंबर रोजी सीबीआयने 1 कोटी 51 लाखांच्या जुन्या नोटा बदलण्याचा प्रयत्न करणा-या आरबीआय अधिका-याला अटक केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *